शशिकांत पाटील, लातूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि परिसरात ३० सप्टेंबर १९९३ रोजी महाप्रलयंकारी भूकंप झाला होता. त्याला आज २३ वर्ष पूर्ण झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किल्लारी भूकंपाच्या आठवणीनं २३ वर्षांनंतरही अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. या महाप्रलयकारी भूकंपात संपूर्ण किल्लारी गाव उद्ध्वस्त झालं होतं... हजारो नागरिकांचा बळी गेला होता. आज या घटनेला २३ वर्षे झाली पण भूकंपग्रस्तांच्या समस्या काही सुटलेल्या नाहीत. 


पुनर्वसनाच्या नावाखाली शासनानं बांधून दिलेल्या घरांना तडे गेलेत... अनेक घरं मोडकळीला आलीत... व्यापाऱ्यांसाठी बांधून ठेवलेले पाचशेहून अधिक गाळे चुकीच्या ठिकाणी बांधल्यानं धूळखात पडलेत. मुलभूत सोयी-सुविधांसाठी किल्लारीच्या ग्रामस्थांचा झगडा सुरू आहे. 


भूकंपग्रस्तांना नोकरीत ३ टक्के आरक्षण मंजूर झालं खरं पण त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाहीच. किल्लारीतील भूकंपग्रस्तांच्या स्मरणार्थ बांधलेल्या वास्तूच्या सर्व फरश्या अशा निखळून पडल्यायत. स्मृती उद्यानाची दूरवस्था झालीय तर वस्तू संग्रहालयात एकही वस्तू नसून ही वास्तू भग्नावस्थेत आहे. जनावरं बांधण्यासाठी ही वास्तू वापरली जाते. एकूणच भूकंपग्रस्त गावं आणि इथल्या नागरिकांच्या समस्या शासन आता तरी गांभीर्यानं पाहणार का? हा प्रश्न आहे.