एप्रिलमध्येच सांगलीतील ६ तालुके पडू लागले कोरडे
ऐन एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यातले सहा तालुके कोरडे पडू लागले आहेत. तिथल्या हवालदिल जनतेला प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा सुरु केलाय. मात्र तरीही अनेक गावं तहानलेलीच आहेत.
सांगली : ऐन एप्रिल महिन्यातच सांगली जिल्ह्यातले सहा तालुके कोरडे पडू लागले आहेत. तिथल्या हवालदिल जनतेला प्रशासनानं टँकरनं पाणी पुरवठा सुरु केलाय. मात्र तरीही अनेक गावं तहानलेलीच आहेत.
सांगली जिल्ह्यात कमी झालेला पाऊस आणि अपुऱ्या जलसिंचन योजनांमुळे यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातल्या जत,आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगाव आणि शिराळा या सहा तालुक्यांतल्या जवळपास १५० हून अधिक गावातली स्थिती भयानक आहे. इथल्या अनेक गावांतल्या विहिरी, बोअर आणि तलाव आटले आहेत. पाण्यासाठी लोक वणवण करताहेत, तर पाणी आणि चाऱ्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत.
अनेक गावात लोकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाणी टंचाईवर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ८६ टँकरद्वारे या सहा तालुक्यांतल्या ८६ गावं आणि ५७६ वाड्यांना पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र मागणी करुनही टँकर मिळत नसल्याची अनेक टंचाईग्रस्त गावांची तक्रार आहे. पाण्यासाठी स्थलांतर सुरु झालं आहे.
एप्रिल महिन्यात जिल्ह्यात ही स्थिती निर्माण झाल्यामुळे, जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. दरम्यान मागणी होईल तिथे तत्काळ टँकर सुरु केले जात असून, पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपयायोजना आखण्यात आल्या असल्याचं जिल्हा प्रशासनानं सांगितलंय.निसर्गाच्या अवकृपेमुळे वर्षोनुवर्षं पाणी टंचाईचा फटका सहन करत असलेल्या सांगलीकरांची तहान भागवण्यासाठी, प्रशासन आणि सरकारनं तातडीनं ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.