भैरवनाथाच्या रथाखाली चिरडून मानकऱ्याचा मृत्यू
चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे कालभैरवनाथ यात्रोत्सवाच्या परतीच्या रथ मिरवणुकीत मानकरी भाऊसाहेब लहानू निकम यांचा रथाच्या चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झालाय. यात्रोत्सव थाटामाटात पार पडला असला तरी या यात्रेट शेवट मात्र दुर्दैवी झाला.
नाशिक : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे कालभैरवनाथ यात्रोत्सवाच्या परतीच्या रथ मिरवणुकीत मानकरी भाऊसाहेब लहानू निकम यांचा रथाच्या चाकाखाली गेल्याने जागीच मृत्यू झालाय. यात्रोत्सव थाटामाटात पार पडला असला तरी या यात्रेट शेवट मात्र दुर्दैवी झाला.
वडनेर भैरव येथे गेल्या दहा दिवसांपासून कालभैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरु होता. आज सकाळी १० वाजता परतीची रथ मिरवणूक मंदिराच्या दिशेने सुरु झाली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास मिरवणूक सावता महाराज चौकात आली. या ठिकाणी रथाच्या धटावर बसण्याचा मान असलेले माळी परिवारातील भाऊसाहेब लहानू निकम हे मिरवणुकीतील गर्दीमध्ये तोल जाऊन खाली पडले.
या दुर्घटनेत त्यांच्या अंगावरून बैलांनी जुंपलेल्या रथाचे चाक गेले. यात ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांना वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी निकम यांना मृत घोषित केलं.
यात्रेत अनेकदा दुर्घटना झाल्या आहे परंतु आजपर्यंत भाविकांच्या जीवावर बेतणारी ही पहिलीच घटना असल्याने यात्रेच्या अगदी शेवटी भाविकांच्या आनंदावर विरजण टाकले गेले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट व यात्रा कमिटी यांच्या चांगल्या नियोजनाने यात्रा निर्विघ्न पार पडेल असे चित्र असताना अवघी तासाभराची मिरवणूक बाकी असताना ही दुर्दैवी घटना घडली. रथ मिरवणूक काल सकाळी घराकडे जाण्यासाठी निघाली होती. रात्री पुन्हा मंदिराकडे निघालेला असताना रथ मंदिराच्या मागील बाजूस सावता चौक भागात ही घटना घडली आहे.