तासगाव : सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सत्तेची मस्ती दाखवत असल्याची टीका, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी, सरकारकडे नोटा छापायचे यंत्र आहे काय?, असे वक्‍तव्य करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तेची मस्तीच दाखवली असं अजित पवारांनी म्हटले आहे. अंजनी येथे आर. आर. पाटील यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळात पाणी आणि चाऱ्याचे नियोजन करणे सरकारचे कर्तव्यच असते, मात्र या सरकारमधील एक मंत्री चारा छावण्या बंद करण्याचे फर्मान काढत आहेत, तर येथील पालकमंत्री, 'पैसे भरा त्याशिवाय पाणी नाही‘' असे बोलू लागले आहेत. आजपर्यंत कोणत्याही सरकारमधील मंत्र्यांनी दुष्काळग्रस्तांना असे वाऱ्यावर सोडले नव्हते, असंही अजित पवारांनी म्हटले आहे. 


मध्यंतरी चंद्रकांत पाटील यांनी म्हैसाळ योजनेच्या पाण्याबाबत आता शेतकऱ्यांना फुकट पाणी मिळणार नाही, पैसे भरावेच लागतील, असे विधान केले होते. गेल्या दहा वर्षांत सरकारने म्हैसाळचे बिल टंचाईतून देऊन शेतकऱ्यांना फुकट पाण्याची सवय लावली आहे. मात्र, वीजबिल भरण्याची सवय शेतकऱ्यांना लागलीच पाहिजे. जोपर्यंत पैसे भरणार नाही तोवर योजना सुरू होणार नाही. 


एवढेच नाही तर कितीही आंदोलन करा पैशाशिवाय पाणी नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी बजावले असल्याची चर्चा होती, याचा समाचार अजित पवार यांनी आज घेतला.