कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिल भोसले यांना पराभूत करण्यासाठी बंडखोर विलास लांडे यांना सर्व पक्षीय पाठींबा मिळणार अशी चर्चा सुरु असतानाच भाजपची डोकेदुखी वाढलीय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजप मध्ये प्रवेश करणाऱ्या अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी विलास लांडे यांना भाजप पाठिंबा देणार असेल तर पक्ष सोडण्याचा इशारा दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे आणि विलास लांडे यांचं विळा भोपळ्याचं सख्य अवघ्या पुणे जिल्ह्याला माहीत आहे. विलास लांडे यांच्यासारख्या तंगड्या उमेदवाराच्या खांद्यावर बंदूक ठेऊन राष्ट्रवादीची गेम करण्याचा सर्वच विरोधकांचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. पण विलास लांडे यांच्या आणि भाजपच्या या भूमिकेला अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी विरोध केलाय... काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे पक्ष सोडण्याचीही धमकी दिलीय. तर भाजपने याबाबत सावध भूमिका घेतलीय. 


महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने महेश लांडगे यांना पक्षात घेतलं. त्यांनीच असा इशारा दिल्याने पक्षाची गोची होण्याची शक्यता आहे.. पण दुसरीकडं महेश लांडगे यांचं वाढतं राजकीय प्रस्थ अनेकांना खटकतंय. त्यामुळं त्यांचा इशारा मनावर न घेण्याची भूमिका काहीजण घेत आहेत, त्यातून कसा मार्ग निघतो यावरच सर्व काही अवलंबून राहणार आहे.