नाशिक : आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी गडावर फ्युनिक्यूलर ट्रॉली उभारण्याच्या कामाला वेग आलाय. त्यामुळे तीन मिनिटात तुम्ही पोहोचून देवीचे दर्शन घेऊ शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्युनिक्यूलर ट्रॉली या ट्रॅकवर चढविल्या आहेत. त्यांची चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.  
कोलकाता येथून ट्रॉली आणण्यात आल्या असून, संपूर्णपणे वातानुकूलित या ट्रॉलीला जाण्या-येण्यासाठी कुठल्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत व चाचणी घेण्यासाठी परदेशातून अभियंते बोलविण्यात आले आहेत. 


फ्युनिक्यूलर ट्रॉली हा देशातील पहिला महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. यामुळे महिला, अपंग वृद्ध, भाविकांची गैरसोय थांबून त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुखकर आणि अवघ्या तीन मिनिटात होणार आहे. 
 
सप्तशृंग देवीचे मंदिर डोंगरकडय़ाच्या मध्यभागी आणि पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असून, भाविकांना मंदिरात ५५० पायऱ्या उंच चढून जावे लागते. फ्युनिक्यूलर ट्रॉलीचा पर्याय शोधण्यात आला. ही ट्रॉली १.५ मीटर रुंदीच्या आणि २५० मीटर लांबीच्या रेल्वेमार्गावरून जाणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रेनसारखी असणार आहे. 
 
विद्युतीकरणावर चालणारी ही ट्राली सिस्टीम डोंगरात उभारली गेली असून, येथेही कोकण रेल्वे पॅटर्ननुसार संरक्षणाची सोय करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत प्रवासी प्रतीक्षालय, बुकिंग ऑफिस, स्टाफ रूम, वेटिंग प्लॅटफॉर्म, स्वच्छतागृह, शौचालय, हॉटेल आदी सुविधा असणार आहेत.