आकाशातून लेण्याद्रीच्या गिरजात्मकाचे दर्शन घ्या
जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे.
लेण्याद्रीचे महत्त्व
माया सा भुवनेश्वरी शिवसती देहाश्रिता सुंदरी ! विघ्नेशं सुतमाप्तुकाम संहिता कुर्वेत्तेपो दुष्करम !!
तख्या भूत्प्रकट प्रसन्नवरदो तिष्ठतया स्थापित ! वंदे ह गिरिजात्मज परमजं तं लेखनाद्रिस्थितम !!
पाहा व्हिडिओ जाहिरातीखाली
कुठे आहे लेण्याद्री
जुन्नरपासून अवघ्या ८ किलोमीटरवर लेण्याद्री डोंगर आहे. हा विशाल डोंगर आणि त्यावरील लेण्यांचं अगदी दूर अंतराहूनही दर्शन होतं. गणेशपुराणात या डोंगराचा लेखनपर्वत असा उल्लेख आहे. पावसाळ्यात हा डोंगर हिरवाईनं नटलेला असतो. अशा प्रसन्न वातावरणात आपल्या मनात लेण्याद्रीचा गिरिजात्मक गणरायाच्या दर्शनाची ओढ दाटून येते. अष्टविनायकातील इतर गणपतींप्रमाणे या गणपतीचीही स्वतंत्र अशी आख्यायिका आहे. आपल्याला गजानन पुत्र व्हावा यासाठी पार्वतीनं लेण्याद्री पर्वताच्या गुहेत १२ वर्षं तपश्चर्या केली. त्याचं फलित म्हणून पार्वतीनं स्थापन केलेली गजननाची पार्थिव मूर्ती भाद्रपद चतुर्थीला सचेतन होऊन पुत्ररूपानं तिच्यासमोर प्रकटली असं सांगतात. तेव्हापासून हे ठिकाण गिरिजात्मक गणपतीचं अधिष्ठान असल्याची मान्यता आहे. पायथ्यापासून सुमारे साडेतीनशे पायऱ्या चढून गेल्यांनतर गिरिजात्मकाचं मंदिर लागतं. मंदिर दक्षिणमुखी असून त्यासमोर भव्य सभामंडप आहे. मंदिर दक्षिणमुखी असलं तरी आतील मूर्ती उत्तराभिमुख आहे. अगदी आखीव रेखीव नसली तरी ही मूर्ती असंख्य गणेशभक्तांचं श्रद्धास्थान आहे.
पर्वत चढण्याचे कष्ट...
अष्टविनायकातील एक असल्यानं गिरिजात्मकाच्या दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. पर्वत चढण्याचे कष्ट असले तरी इथल्या बाप्पाच्या दर्शनानं भाविक संतुष्ट होतात.
लेण्याद्रीवरील लेण्या हा देश विदेशातील पर्यटक तसंच अभ्यासकांच्या आकर्षणाचा विषय आहे. लेण्याद्रीवरील लेण्यांबद्दल अनेख आख्यायिका आहेत. मात्र त्याला शास्त्रीय आधार नाही. त्यामुळे गिरिजात्मकाचं मंदिर हे लेण्याद्री पर्वतावरील बौद्धकालीन लेण्यांचाच भाग असल्याचं अभ्यासक सांगतात. गणपती मंदिराच्या लेणीत प्राचीन शैलीची सुंदर अशी चित्र आहेत. पर्वतावर एकूण १८ लेण्या आहेत. पाषाणातील कोरीवकामाचा हा विलोभनीय आविष्कार म्हणावा लागेल.
प्राचिनत्व प्राप्त...
इथल्या लेण्यांमुळं मंदिर परिसराला प्राचीनत्व प्राप्त झालंय. त्यामुळे या लेण्यांच्या संरक्षणाची तसंच देखभालीची जबाबदारी पुरातत्व विभागाकडे आहे. मंदिरातील पूजा- अर्चेची व्यवस्था पाहण्याचा अधिकार इथल्या देवस्थानकडे आहे. त्यामुळे मंदिराच्या वाटेवर तसंच मंदिर परिसरात भाविकांसाठी म्हणून काही सुधारणा करण्यास मर्यादा आहेत. तरीदेखील देवस्थानतर्फे लेण्याद्रीचा पायथ्याशी भक्त निवास, भोजन व्यवस्था, वाहनतळ अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
कसा आहे लेण्याद्री परिसर
लेण्याद्री परिसर भाविक भक्तांनी नेहमीच फुललेला असतो. लेण्याद्रीच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा आहेत. पायथ्याशी असलेलं गोळेगाव हे द्राक्षग्राम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथल्या प्रसादाच्या दुकानांमध्ये नानाविध प्रकारचे मनुके विक्रीसाठी ठेवलेले असतात. त्यामुळे तीर्थस्थळ पर्यटन आणि स्थानिक कृषी संस्कृती यांचा उचित मेळ याठिकाणी श्री गणेशाच्या कृपेनं जुळून आलाय असं नक्कीच म्हणता येईल.
डोलीच्या व्यवसाय...
लेण्याद्रीवरील गिरिजात्मकाच्या दर्शनाची आस मनात असली तरी इथल्या साडेतीनशे पायऱ्या चढून जाणं मोठं अवघड काम आहे. वृद्ध, अपंग, आजारी तसंच अशक्त भाविकांसाठी ही अशक्यप्राय गोष्ट आहे. अशावेळी मदत होते ती इथल्या डोली म्हणजेच विशिष्ट प्रकारच्या पालख्यांची. लेण्याद्री परिसरातील आदिवासींचा हा पिढीजात व्यवसायच म्हणावा लागेल. या पालख्यांचे भोई दिवसभर भाविकांची चढ - उतर करत असतात. अलीकडच्या काळात त्यांनी एकत्र येऊन या व्यवसायात सुसूत्रता आणलीय. काम मोठं कष्टाचं असलं तरी ते त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन बनलंय. त्याजोडीला भाविकांना देवदर्शन घडवल्याचं समाधान त्यांच्या पदरी पडतं.
निसर्गाच्या सौंदर्य...
लेण्याद्रीचं दर्शन घेतल्यानंतर जुन्नरमधील शिवनेरीसमोर नतमस्तक व्हायचं आणि नाणेघाटाकडे चालायला लागायचं... हिरव्यागर्द झाडीतून वाहणारे ओढे नाले पार करत जाणारा कच्चा - पक्का रस्ता आपल्याला नाणेघाटाकडे घेऊन जातो. पावसाळ्यामध्ये दोन्ही बाजूला विस्तीर्ण पसरलेली भात खाचरं तसंच डोंगर वाटा मनोहारी भासतात. अशा वातावरणात रस्त्याच्या शेवटाला आपण नाणेघाटात पोहचल्याचा अनपेक्षित साक्षात्कार होतो. हा नाणेघाट आणि इथलं सारंकाही अचंबित करणारं आहे. वर मावळ आणि खाली कोकण... या दोन्हींना जोडणारा घाट रस्ता म्हणजे हा नाणेघाट. या नाणेघाटाला ऐतिहासिक पार्शवभूमी आहे. त्याला इसवीसन पूर्व १८९ वर्षांचा संदर्भ आहे. त्याकाळी सातवाहन राजवट होती. तिचं केंद्र जुन्नर होतं. महाराणी नागणिका सातवाहन राज्याची सम्राज्ञी होती. या राणीनं घाटामध्ये ही अवघड लेणी खोदून इथं हा घाट रस्ता बांधल्याचं अभ्यासक सांगतात. व्यापार हा त्यामागचा हेतू होता. त्यामुळेच नाणेघाट हा त्याकाळचा प्रमुख व्यापारी मार्ग म्हणून अस्तित्वात होता. नाणेघाटावर ठेवण्यात आलेला दगडी रांजण त्याचीच साक्ष देतो.
नाणेघाटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पुरातत्वीय संदर्भाबरोबरच जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून नाणेघाटाला अनोखं महत्व आहे.
निसर्गाचे नानाविध आविष्कार इथं अनुभवायला मिळतात. असं असलं तरी हा संपूर्ण परिसर पर्यटन तसंच प्रसिद्धीपासून वंचित असल्याचं म्हणावं लागेल. नाणेघाटाचा इतिहास आणि एकूणच महत्व जगासमोर यायला पाहिजे अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त होते.
नाणेघाटाचं थरार...
खालच्या बाजूनं येणारा सोसाट्याचा वारा आणि वरून खाली पाहिलं तर भिरभिरणारी नजर... सारंकाही विशाल आणि अथांग... चमत्कार भासावा असा हा अनुभव... काही गोष्टींची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. नाणेघाट आणि इथला निसर्ग त्यापैकीच एक...त्यामुळे इथं उभं राहून समोर जे दिसतं ते मनाच्या कुपीत कायमस्वरूपी साठवून ठेवायचं... निसर्गात देव शोधणाऱ्यांना या दृश्यामध्ये स्वतःचा बाप्पा दिसल्याचं आश्चर्य वाटायला नको....
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या अष्टविनायक गणपतीचे आपण नेहमी जमिनीवरून दर्शन घेतले आहे. पण आता या गणपतीच्या परिसराचे मनमोहक आकाशातून दर्शन सर्व गणेश भक्तांना करून देण्याची दोन अवलियांनी एक भन्नाट प्रयत्न केला आहे.
सुशांत श्रीकांत कोयटे, श्रीकांत नारायण झंवर या युवकांच्या झॉन मीडियाने अष्टविनायकांचं आकाशातून दृश्य टिपलं आहेत, मोरेश्वराचं मोरगाव पाहिलं तर आता सिद्धटेकचा सिद्धिविनायकाचे आकाशातून दर्शन देणार आहोत.
सुशांत श्रीकांत कोयटे आणि श्रीकांत नारायण झंवर हे दोन तरूण मूळ आयटी क्षेत्रातील असून ते अमेरिका आणि इंग्लड या ठिकाणी आयटी क्षेत्रात कार्यरत होते. पण आपल्या देशात आपल्या मातीत काही तरी नवीन करावे या उद्देशाने झपाटून झॉन मीडिया स्थापन केली. कोणत्याही कामाच सुरूवात श्रीगणेशाची वंदन करून केली जाते. त्यामुळे त्यांनी आपला पहिला प्रॉजेक्ट हा गणपतीचाच असला पाहिजे असे ठरविले.
त्यामुळे गेल्या चार ते पाच महिन्यापासून महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या ठिकाणी या दोघांची भटकंती सुरू असून यातून कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन त्यांनी ठेवला नाही. अष्टविनायकाच्या प्रोजेक्टपासून सुरूवात करायची असे सुशांत आणि श्रीकांत यांनी ठरवूले. यासाठी आवश्यक ती सामुग्री घेऊन हे तरूण निघाले अष्टविनायकाला आकाशातून टीपायला.
या अवलियांनी अष्टविनायकाचे शुटिंग पूर्ण झाले असून त्याचा पहिला व्हिडिओ त्यांनी मोरगावचा मोरेश्वर यूट्यूबवर टाकला. असे मोरगाव आपण कधीच पाहिले नव्हते. झी २४ तासने सुशांत कोयटे आणि श्रीकांत झंवर यांच्याशी संपर्क साधला. आपल्या या अभिनव प्रकल्पाबद्दल ते भरभरून बोलत होते. अमेरिकेतून परतल्यावर काही तरी वेगळं काम करण्याचं आम्ही ठरवलं त्यानुसार हा प्रोजेक्ट हातात घेतला. यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागल्या. अनेकांना विनंती करावी लागली. आमचा कमर्शिअल उद्देश नसल्याचं सांगावं लागलं. मग आम्हांला शुटिंगला परवानगी मिळाली.
या सर्व कार्यात मंदिराच्या ट्रस्टींनी खूप मदत केली. त्यांनी आम्हांला शुटिंगला खूप मदत केली. आकाशातून शुटिंग करताना खूप मजा आली. परदेशात असताना खूप रिसर्च केला होता. यात होल अँड सोल आम्ही आहोत. शुटिंग, एडिटिंग, ग्राफिक्स आणि म्युझिक कम्पोज या सर्व गोष्टी आम्हीच केल्याचे श्रीकांत झंवर यांनी सांगितले.
मूळचे कोपरगावचे असलेले सुशांत कोयटे यांनी अमेरिका पाहिली होती पण कोकणात जाण्याचा त्यांचा कधी योग आला नव्हता. पण अष्टविनायकातील काही गणपती कोकणात असल्याने पहिल्यांदा निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण पाहिला आणि कोकणाच्या प्रेमातच पडलो. आम्ही शुटिंग केली त्यावेळी पावसाळा सुरू होता. त्यामुळे शुटिंग करण्यात आणखी मजा आली. आपला देशात असं वातावरण असतं हे कधी विचारही केला नव्हता, असे कोयटे यांनी सांगितले.