सातारा : खासदार उदयनराजे भोसलेंच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. जावळी तालुक्यातील खर्शी मुरा गावात ही घटना घडलीय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयनराजे भोसले जावळी तालुक्यात निवडणुकीच्या मतदानाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी, खर्शी इथं आधीपासूनच राष्ट्रवादीचे म्हसवे गटातील उमेदवार वसंत माणकुमरे उभे होते.


उदयनराजेंच्या ताफ्यावर दगडफेक

यावेळी, माणकुमरे आणि उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांत क्षुल्लक कारणावरून हाणामारी सुरू झाली. यात माणकुमरे समर्थकांनी उदयनराजे यांच्या गाडी ताफ्यावर दगडफेक केली. 


दगडफेक सुरू झाल्यानंतर उदयनराजेंची गाडी घटनास्थळावरून पुढे निघून गेली... पण, त्यांच्यामागे असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या मात्र दगडफेकीत काचा फुटल्या. यात शिवसेनेच्या राजू गोळे यांचीही गाडी राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी फोडली.


राजू गोळे यांच्या गाडीची तोडफोड 

घटनेनंतर उदयनराजे तातडीनं साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले. मात्र, त्यांचे लहान बंधू आणि कट्टर राजकीय शत्रू आमदार शिवेंद्रराजे भोसले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उदयनराजे यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यासाठी तालुका पोलीस स्टेशन गाठलं. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय.  


उदयनराजे दहशत माजवण्यासाठी जावळीत आले होते. राष्ट्रवादीच्या वसंत माणकुमरे यांना आधीच उदयनराजे यांनी मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप यावेळी राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे यांनी केलाय. 


तर दुसरीकडे, उदयनराजे भोसले आपल्या कार्यकर्त्यांसह सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेत. दगडफेक करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख संदिप पाटील यांच्याकडे केलीय.