कल्पनेच्या पलिकडले कॉपीकांड... काय रेट होता पेपर सोडविण्याचा
औरंगाबादमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घरी पेपर सोडवत असल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येतेय... नेमका हा काय प्रकार होता... पाहूयात...
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादमधील इंजिनिअरिंगचे विद्यार्थी घरी पेपर सोडवत असल्याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येतेय... नेमका हा काय प्रकार होता... पाहूयात...
साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज... इथं अॅडमिशन घ्या आणि पास व्हायची चिंता कॉलेजवर सोडा, अशीच औरंगाबादच्या या कॉलेजची ख्याती होती...
प्रवेशावेळीच विद्यार्थ्यांना यासंदर्भात माहिती दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आलीय. त्यामुळे या कॉ़लेजमध्ये बहुतांश मुलं ही पार्टटाईम शिकणारी होती...
ही मुलं केवळ परीक्षेवेळीच कॉलेजला यायची आणि अशा पद्धतीनं पेपर सोडवून पास व्हायची अशी माहिती तपासात पुढे आलीय. गेल्या 3 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. हे कॉलेज विशिष्ट रक्कम घेवून विद्यार्थ्यांना सहज पास करत असे.
त्यासाठी पूर्ण संस्थाच कामाला लागायची. अगदी प्राचार्य, प्राध्यापकांसह कस्टोडियन, संस्थाचालक सगळेच पैशांसाठी विद्यार्थ्यांच्या दिमतीला असायचे... पाहूयात पास होण्यासाठी रेटकार्ड कसं असायचं...
काय रेट होता पेपर सोडविण्याचा....
इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षासाठी 20 ते 30 हजारांचं पॅकेज असायचं... विषयानुसार रेट ठरत होता... अंतिम सत्रासाठी मोठी रक्कम आकारली जायची...गणित विषयासाठी 10 हजार तर सोप्या पेपरसाठी 5 हजार घेतले जायचे... पेपर आणण्यापासून ते विद्यार्थ्यांकडून गुप्त जागेवर पेपर सोडवून घेण्याची जबाबदारी प्राध्यापकांची असायची...
ज्यांचा सौदा ठरला आहे ते विद्यार्थी पेपरवर ठरल्यानुसार गुप्त खूण करायचे, त्यानुसार ते पेपर कस्टोडीयन सील फोडून बाहेर काढायचा.. त्यानंतर कॉलेजकड़ून पेपर कुठं सोडवायला यायचे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जायची, त्याठिकाणी प्राध्यापक विद्यार्थ्यांना पेपर सांगायचे. आणि पेपर सोडवून झाला की पुन्हा सिल बंद करून विद्यापीठाला दुस-या दिवशी पाठवून द्यायचा
पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी छापा टाकला... त्यावेळी प्राध्यापक उत्तरं सांगत होती आणि मुलं पेपर लिहत असल्याचं चित्र पोलिसांनी पाहिलं. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत 27 विद्यार्थ्यांसह, 2 प्राध्यापक, संस्थाचालक, आणि ज्यांच्या घरी पेपर सोडवणं सुरु होते ते नगरसेवक सीताराम सुरे यांना अटक केलीय.
या सगळ्यात विद्यापीठातील कर्मचा-यांचा हात असल्याचाही पोलिसांना संशय आहे. कारण सुरुवातीला होम सेंटर रद्द करण्यात आलं होतं. अखेरच्या क्षणी पुन्हा होम सेंटर बहाल करण्यात आलं. पेपर झाल्यानंतर विद्यापीठानं तातडीनं पेपर ताब्यात घेणं गरजेचं असतांना हे पेपर संपूर्ण रात्र कॉलेजलाच रहायचे...यातही संशयाला वाव आहे. आता या परिस्थितीत सगळ्यांची चौकशी होणार यात वाद नाही, मात्र या घटनेनं औरंगाबादचं शिक्षण क्षेत्र आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्हं उभं राहिलंय. आता किमान लागलेला हा बट्टा योग्य चौकशी करून पुसण्यास सगळ्यांनीच मदत करावी ही अपेक्षा...