लक्ष्मीकांत रुईकर, बीड : बीडमध्ये झालेल्या एका सोहळ्यात तब्बल 166 मुलींचं बारसं करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नववर्षाचे स्वागत कीर्तन महोत्सवाने करण्याची बीडमधल्या खटोड प्रतिष्ठानची परंपरा आहे. गेल्या तेरा वर्षांपासून याच पद्धतीनं इथे नववर्षाचं स्वागत केलं जातं. यंदा मात्र एक नवी पद्धत सुरू करण्यात आली. 


मुलींच्या जन्माचं स्वागत करत सामूहिक बारशाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'बेटी बचाव  बेटी पढाव’ हा संदेश यानिमित्तानं देण्यात आला. तब्बल 166 मुलींचं बारसं एकाच मंडपात संपन्न झालं.


ऑक्टोबर 2016 ते ते डिसेंबर 2016 या तीन महिन्यांच्या काळात जन्म झालेल्या मुलींचा सामूहिक नामकरण सोहळा करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी बीडकरांना मुलींच्या नाव नोंदणीचं आवाहनही करण्यात आलं. 


या आवाहनाला प्रतिसाद देत बीड शहरासह मराठवाड्याच्या विविध भागातून अनेक कुटुंबांनी या अनोख्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सुरुवातीला फक्त 51 मुलींच्या नामकरणाचा सोहळा होणार होता. पण, या उपक्रमाला मिळालेला प्रतिसाद पाहून 166 मुलींच्या नामकरणाचा सोहळा उत्साहात साजरा झाला.


कीर्तन महोत्सवाच्या सभामंडपात एकाचवेळी 166 मुलींचे पाळणे हलवून.... मुलींच्या आत्यांनी मुलींचं नाव ठेवलं. या सोहळ्याला 166 मुलींचे भरपूर नातेवाईकही उपस्थित होते. सगळ्यांनीच या उपक्रमाला दाद दिली. 


स्त्री भ्रूण हत्येमुळे बीड जिल्हा संपूर्ण देशात बदनाम झाला होता. त्याच बीडमध्ये मुलींच्या जन्माचं स्वागत करत ही नवी प्रथा सुरू झालीय. नव्या वर्षाच्या स्वागताला मुलींच्या जन्माचाही हा स्वागत सोहळा सगळ्यांनाच आनंद देऊन गेला.