नोटबंदीचा विडी उद्योगाला फटका, मजुरांना अजूनही पगार नाही
नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे.
सोलापूर : नोटबंदीचा फटका सोलापुरातील 70 हजार विडी कामगार महिलांना बसला आहे. मागील सहा आठवड्यांपासून या महिलांचे पगार झाले नाहीत. विडी उद्योगवार अवलंबून असे जवळपास सव्वा कोटी कामगार तर 400 विडी कारखाने भारतात आहेत.
फक्त सोलापुरची संख्या बाघितली तर येथे 14 विडी कारखाने तर 70 हजार विडी कामगार महिला या उद्योगावर अवलंबून आहेत. आठवड्याला एकूण 4 कोटी रुपये मजूरी या 14 कारखान्यांच्या माध्यमातून विडी कामगार महिलांना मिळते. नोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यापासुन या कामगारांना आजतागायत मजुरी मिळाली नाही.
हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार महिलांच्या घरात पैशांविना एकवेळ जेवण करण्याची वेळ आली आहे. या महिलांना रोख मजूरी मिळावी यासाठी विडी कामगार संघटना आग्रही आहेत. कारखानदारांची खाती असलेल्या बँकांमध्ये महिलांना त्यांची खाती काढायला सांगीतली आहेत. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला किमान तीन महीने उलटतिल. तो पर्यंत कुटुंबाचा उदारनिर्वाह चालणार कसा ? असा संतप्त सवाल कामगार करत आहेत.
काळ्या पैशाला चाप लावण्यासाठी नोटबंदीचा घेतलेला निर्णय योग्य असला तरी या निर्णयाच्या कठोर अंमलबजावणीचा मोठा फटका विडी कामगारांना बसलाय. आता नियमीत मजुरी मिळण्यासाठी कसा मार्ग निघतो ते बघणं महत्त्वाचं आहे.