भिवंडी हत्याप्रकरणात भाजपचा कार्यकर्ता : नारायण राणे
मनोज म्हात्रे यांचा मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.
ठाणे : भिवंडी हत्याप्रकरणाला नवं वळण लागले आहे. मनोज म्हात्रे यांचा मारेकरी हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी केला.
दरम्यान भिवंडी महापालिकेतले काँग्रेसचे सभागृह नेते मनोज म्हात्रे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणी, मनोज म्हात्रेंचा चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे याच्यासह ६ ते ७ जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन आणि घरगुती वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फरार प्रशांत म्हात्रे याचा पोलीस शोध घेत आहेत. मनोज म्हात्रे यांच्यावर गोळीबार करीत तलवार, कोयत्याने हात-पाय तोडून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले आहे. त्यांचा चुलतभाऊ प्रशांत म्हात्रे यानेच हा हल्ला घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, पाच वर्षांपूर्वी प्रशांतला निवडणूक लढविण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवून त्याने ही हत्या केल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.