कैलास पुरी, प्रतिनिधी, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सध्या विकासकामं, आगामी प्रकल्प यापेक्षा कोणता मुद्दा चर्चेत असेल तर तो विरोधी पक्षासाठी दिल्या जाणाऱ्या कक्षाचा. शहरात अनपेक्षितपणे सत्ता बदल झाल्यानंतर भाजप सत्तेत आले आणि राष्ट्रवादी विरोधी बाकावर बसलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आतापर्यंत शहरात विरोधी पक्षांचं अस्तित्व शून्य होतं त्यामुळे त्यांना दिला जाणारा कक्ष ही छोटा होता, पण सत्तेतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीची शक्ती कमी झाली असली तरी त्यांची संख्या ३६ आहे त्यामुळे राष्ट्रवादी कडून मोठ्या कक्षाची मागणी करण्यात आली.


अर्थात इथं पर्यंत ठीक होतं पण त्यानंतर राष्ट्रवादीने महापौर कार्यालयासमोर खुर्च्या टाकून कामकाज सुरु केले आणि सुरु झाला अहंकाराचा वाद. राष्ट्रवादीची ही नौटंकी असल्याचं सांगत भाजप ने त्यांच्या कक्षाचा प्रश्न तीन महिने झाले लटकवत ठेवलाय. भाजपला सत्तेचा माज चढलाय अशी टीका राष्ट्रवादी करतेय तर राष्ट्रवादीच हा प्रश्न जाणीवपूर्वक चर्चेत ठेवत असल्याची टीका केलीय.


वास्तविक पाहता शहराला सध्या अनेक प्रश्न भेडसावत आहेत. स्वच्छ भारत अभियानात शहर ९ व्या क्रमांकावरून ७२ व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. पाणी कपातीचे संकट उभे आहे. इतरही अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना चर्चा करायला वेळ नाही. सध्या दोन्ही पक्षांसाठी कक्षाचा प्रश्न महत्त्वाचा आणि मुख्य म्हणजे इगोचा झालाय.