नाशिक : भाजपचं बहुमत असलेल्या नाशिक महापालिकेत आता पारदर्शकता काय असते ते दाखविण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. गटनेता निवडत असतांना शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका महापलिकेत परखड विरोधकांची असल्याचं स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विलास शिंदे यांची गटनेता म्हणून निवड करत महसूल कार्यालयात नोंदणी केली. यावेळी सर्वांनी एकत्रित शक्ती प्रदर्शन करत पालिकेतील आपली भूमिका मांडली. मुंबई महापालिकेत सेना-भाजप यांची २५ वर्षांची युती तुटली आणि दोघेही स्वतंत्र लढले. मुंबई महापालिकेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजप नेत्यांनी शिवसेनाला धारेवर धरलं. भाजपने मुंबई महापालिका निवडणूक या मुद्द्यावर लढली आणि भाजप दुसऱ्या क्रंमाकाचा पक्ष ठरला असला तरी त्यांनी चांगलं यश मिळवलं.


पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिकेवर भाजपने सत्ता मिळवली. आता भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेच्या कारभारावर शिवसेना नेत्यांची नजर असणार आहे. शिवसेना देखील पुढे जाऊन भाजपला पारदर्शकतेच्या मुद्दयावर धारेवर धरु शकते.