नाशिक : संगमनेर तालुक्यातील गारोळे पठारमधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दुसरीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यास वर्ग शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करणाऱ्या शिक्षकास पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीला शिकत असलेला सात वर्षांच्या चिमुकल्यास वर्गशिक्षक सतिश भुतांबरेनं वाचता येत नाही या कारणावरून जाड छडीने तसेच लाथेने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मुलाच्या पाठीवर तसेच पायावर जखमा झाल्यात. मुलगा सायंकाळी घरी गेल्यावर आई- वडिलांना हा प्रकार कळला. मुलाची परिस्थिती पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बोटामधील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी आळेफाटा इथल्या खासगी रूग्णालयात हलवण्यात आले. 


दरम्यान, मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात शिक्षक सतिश भुतांबरे याच्या विरोधात बाल सरंक्षक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपी शिक्षकाला गजाआड केले आहे. शाळा प्रशासन आणि जिल्हा परिषदेने याप्रकरणी शिक्षकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुलाच्या नातेवाईकांनी केली आहे.