CMच्या सभेला रिकाम्या खुर्च्या, भाजपवर सभा गुंडळण्याची नामुष्की
शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.
पुणे : शहरातील टिळक रोडवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या सभेला गर्दी झाली नसल्याने 30 मिनिटे वाट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माघारी परतावे लागले. सभा गुंडळण्याची नामुष्की भाजपवर आली.
निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात दाखल झालेत. त्याआधी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे, भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मुख्यमंत्री सभेसाठी आले, मात्र या सभेला अत्यंत तुरळक उपस्थिती दिसली. दुपारच्या सभेसाठी मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही त्यांची सभा सुरु झाली नाही. त्यांनी आणखी वाट पाहिली. मात्र, गर्दी न झाल्याने सभा रद्द करावी लागली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या अनेक सभांना गर्दी होत आहे. मात्र, पुण्यात रिकाम्या खुर्च्यांचे चित्र पाहायला मिळाले. तसेच मुख्यमंत्री व्यासपीठाच्या बाजूलाच खाली थांबल्याचे पाहायला मिळाले. काही वेळ थांबूनही गर्दी होत नसल्याचे पाहून, मुख्यमंत्र्यांनी मंचावरच न जाता थेट पिंपरी-चिंचवडकडे निघून गेलेत.