आरोप होत असलेल्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून जोरदार पाठराखण
भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप होत असलेल्या सर्वच भाजप मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत या सर्व मंत्र्यांना क्लीन चिटही दिली.
पुणे : येथील भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप होत असलेल्या सर्वच भाजप मंत्र्यांची जोरदार पाठराखण करत या सर्व मंत्र्यांना क्लीन चिटही दिली. त्याचवेळी भ्रष्टाचार करणाऱ्यांनी नैतिकता शिकवू नये, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला. तर सरकारनं केलेल्या जलयुक्त शिवार कामाचं कौतुकही त्यांनी आवर्जुन केलं.
ज्या क्षणी आम्ही भ्रष्टाचाराचा अंगिकार केल्याचे सिद्ध होईल क्षणी पदाचा त्याग करू, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या नेत्यांवर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. या कार्यक्रमाला एकनाथ खडसेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.
रावसाहेब दानवे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या खुर्च्यांमध्ये एकनाथ खडसे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. सरकार सध्या प्रामाणिकपणे काम करत असले तरी विरोधकांकडून काही मंत्र्यांना टार्गेट करण्यात येत आहे. गोबेल्स तंत्राचा वापर करून सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणालेत.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते कोणत्या तोंडाने सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपस्थित केला. भ्रष्टाचाऱ्यांनी आम्हाला शिष्टाचार शिकवू नये. प्रथम सरकारचे भूखंड परत करा मग आरोप करा, असे सांगत त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
खडसेंवरील प्रत्येक आरोप हा तथ्यहीन आहे. त्यांना दाऊदकडून कुठलाही कॉल आला नाही, हे एटीएसच्या तपासात सिद्ध झाले आहे. याशिवाय, गजानन पाटील प्रकरणाशी त्यांचा संबंध नसल्याचे एसीबीने स्पष्ट केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.