पुणे : पुणेरी प्रवृत्तीचं प्रतिक असलेलं चितळे बंधू लवकरच दुपारी १ ते ४ या वेळेतही सुरु राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र झी 24 तासशी याविषयी काहीही बोलण्यास चितळे व्यवस्थापनानं साफ इन्कार केलाय. आमच्या प्रतिनिधींनी चितळेंच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधाला असता याविषयी आता एक जुलैला बोलू असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं.  त्यामुळे चितळेंच्या दुकानात आता दुकानाच्या वेळेविषयी बोलून आपला आणि दुकानाचा वेळ घालवू नये अशी पाटी लागली तर आश्चर्य वाटायला नको. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चितळे बंधू मिठईवालेचे संचालक इंद्रनील चितळे यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान ही बातमी दिलीय. बाकरवडी, बर्फी, चक्का अशा विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेलं चितळे बंधू हे दुकान १ ते ४ बंद म्हणजे बंद अशी त्याची खासियत आहे. व्यावसायिक म्हणून ही चितळे बंधूंचा शिरस्स्ता असला तरी त्यामुळे ग्राहकांचा अनेकदा हिरमोड होतो. त्यांना चितळेंच्या पदार्थांपासून वंचित राहावं लागतं. मात्र आता चितळेंनी काळानुसार बदलायचे ठरवले आहे. 


खास ग्राहकांच्या आग्राहाखातर त्यांनी येत्या २ जुलैपासून आपली दुकाने दिवसभर उघडी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. एरवी वाकेल पण मोडणार नाही अशा पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन करण्यासाठी चितळे बंधूंचं उदाहरण दिलं जातं. त्यावरून मोठ्या प्रमाणावर विनोदही होतात. आता मात्र ते थांबणार आहे. अर्थात चितळे बंधूंचा हा निर्णय काही पुणेकरांना नक्कीच रुचणार नाहीये. पण इतरांसाठी का होईना त्यांनी बर्फी खाऊन गप्प राहायला हरकत नाही. दरम्यान पुण्याच्या पुणेरीपणाचा उद्धार करण्यासाठी शब्दपंडीतांना दुसऱ्या कुठल्यातरी दुकानाचा शोध घ्यावा लागणार आहे.