पुणे : मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमावरून वाद निवळण्याची चिन्हं नाहीत. शनिवारी 24 डिसेंबरला मेट्रोचं भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. पण त्यात स्टेजवर शरद पवारांना स्थान नाही. त्यामुळे भूमीपूजनाबाबत वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीचं मन वळवण्याचे प्रयत्न पालकमंत्री करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी पुणे मनपात हजेरी लावली. महापालिकेत येऊन बापट यांनी महापौर प्रशांत जगताप यांची भेट घेतली. खुद्द पालकमंत्री जातीनं उपस्थित होते मेट्रोच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमानिमित्ताने. मेट्रोचा पहिला टप्पा पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपातून जातो. या दोन्ही मनपात राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण भूमीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना स्टेजवर स्थान नाही. कार्यक्रमात पवारांना स्थान मिळालं नाही तर वेगळी भूमिका घेण्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलंय. त्यामुळे पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला गालबोट नको म्हणून बापट यांची ही मनपा भेट होती.


मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमात स्टेजवर पिंपरी चिंचवडमधले खासदार अमर साबळेंना स्थान आहे. राज्यसभेतील दुसरे खासदार संजय काकडेंनाही स्थान आहे. मग शरद पवारांना का स्थान नाही असा प्रश्न महापौर प्रशांत जगताप यांचा आहे. मेट्रोसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड दहा टक्के निधी देणार आहे तर 50 टक्के निधी कर्जातून उभारणार आहे. अशा वेळी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला स्टेजवर स्थान का नको असा सवाल राष्ट्रवादीचा आहे.


स्मार्ट सिटी कार्यक्रमाच्या पत्रिकेच महापौरांनाच स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यावरूनही मोठा गदारोळ झाला होता. त्यानंतर महापौर प्रशांत जगताप यांनाही पत्रिकेत नाही पण स्टेजवर स्थान देण्यात आलं. पंतप्रधानांनाही या वादाची दखल घेतली होती. या वादाचा दुसरा अंक आता मेट्रोच्या निमित्ताने सुरू झालाय. राष्ट्रवादीने भाजपला दोन दिवसांचा वेळ दिलाय. त्यानंतर हा वाद काय वळण घेतो हे कळेल.