एकहाती कौशल्य; प्रणवची भारतीय टीममध्ये निवड
जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा!
विशाल करोळे, औरंगाबाद : जिद्द आणि चिकाटी असली तर काहीही शक्य आहे आणि हेच औरंगाबादच्या प्रणव राजळेनं सिद्ध केलंय. प्रणव जन्मापासून एका हातानं अधू आहे. मात्र ज्या पद्धतीनं तो क्रिकेट खेळतो त्याची लय पाहता, खरंच ही एकाच हाताची ताकद आहे का असा प्रश्न पडावा!
औरंगाबादचा प्रणव आता जागतिक पातळीवर भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. प्रणवची अपंगासाठींच्या भारतीय क्रिकेट टीममध्ये निवड झाली आहे. मात्र हा प्रवास प्रणव साठी सोपा नव्हता...
प्रणवला अगदी लहानपणापासून क्रिकेटची आवड. मात्र मुलाचा एक हात अधू असल्यामुळे त्यानं क्रिकेट खेळू नये अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. तरीही प्रणव लपूनछपून क्रिकेटचे धडे गिरवू लागला. यात त्याला आईचा पाठिंबा लाभला. दर्जेदार बॅटिंग आणि त्यापेक्षा उत्तम बॉलिंगनं त्यानं स्वतःची छाप टाकली. त्यानं फिटनेसवर विशेष लक्ष दिलं. महत्वाचं म्हणजे त्याचा अधू हात त्याला कुठलीही अडचण निर्माण करीत नाही. एका हातानंच तो बँटींग करतो, लिलया बॉलिंग तसंच फिल्डींग करतो आणि सहजपणे झेलही टिपतो, असं प्रणवचे प्रशिक्षक राहुल पाटील अभिमानानं सांगतात.
मुलाच्या या यशानं त्याच्या आईवडिलांना आता आकाश ठेंगणं झालंय. भारतासाठी भारताच्या नियमित टिममध्ये खेळण्याची प्रणवची इच्छा आहे. सोबतच अपंगांच्या टीमला बीसीसीआयनं प्रोत्साहन द्यावं ही प्रणवची इच्छा आहे.
६०० मुलांमधून प्रणवनं अपंगांच्या भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. प्रणवची जिद्दच त्याला या यशाच्या राजमार्गावर घेवून आली आहे. त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा.