पुणे : महामार्गावरील मद्यबंदीनंतर रस्त्यांवरील अपघातांमध्ये घट झालीय की नाही हे अजून स्पष्ट व्हायचंय. मात्र या निर्णयानंतर तळीरामांचं दारू पिण्याचं प्रमाण निश्चितपणे कमी झालय. पुणे शहर तसेच जिल्ह्यात मद्यविक्री सुमारे ४० टक्क्यांनी घटल्याचं राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगतेय. पाहूया एक रिपोर्ट... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्यात मद्यविक्रीचे एकूण २५०० परवानाधारक आहेत. महामार्गावरील मद्यबंदीनंतर १६०० आउटलेट्स बंद झालेत. त्यात मोठमोठी हॉटेल्स, रेस्टोरंटस अँड बार, वाईन शॉप्स तसेच देशी दारू दुकानांचा समावेश आहे. 


जिल्ह्यात महिन्याकाठी सुमारे २० लाख लिटर्स देशी दारू, सुमारे २० लाख लिटर्स विदेशी दारू तर ३० लाख लिटर्स बिअर विकली जाते. त्यातून उत्पादन शुल्क विभागाला ११० ते १२० कोटींचा महसूल मिळतो. या महिन्यात मात्र तो ७० कोटींवर येणार असल्याचा अंदाज आहे. 


१ एप्रिल ते १५ एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील मद्यविक्रीत सुमारे ४० टक्क्यांची घसरण झाली आहे. 


आज घडीला शहर आणि जिल्ह्यातील मिळून ७० टक्के आउटलेट्स बंद आहेत. त्यांच्यासमोर व्यवसायाचा प्रश्न निर्माण झालाय. उर्वरित ३० टक्के आउटलेट्स सुरु आहेत. मागील २ आठवड्यांत त्यांच्या व्यवसायात १५ ते २० टक्क्यांची वाढ झालीय. मात्र कुणाचा धंदा बसलाय आणि कुणाचा धंदा वधारलाय याचा विचार करण्याची गरज नाहीये. दारू पिऊन गाडी चालवल्यानं होणारे अपघात टाळले जाणं महत्वाचं आहे.