सातारा : गुंगीचे औषध देऊन सहा जणांची हत्या करून साऱ्या राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोगस डॉ. संतोष पोळची सातारा पोलिसांमध्ये दहशत होती, अशी कबुली विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोळ आपल्या महिला सहकाऱ्याच्या मदतीने स्वत: मारहाण करून घेत असे. तसेच उपोषणाला बसून पोलिसांवर दबाव निर्माण करत असे. वारंवार एसीबीचा धाक दाखवत असल्यामुळं पोलीस अधिकारीही त्याला दचकून असायचे, अशी माहिती पाटलांनी दिली. 


पोळ अत्यंत चालाख गुन्हेगार असून तो केवळ महिलांनाच टार्गेट करायचा. वाई तालुक्यातल्या धोम गावचा रहिवासी असलेल्या पोळचा हत्यांमागचा हेतू काय होता याची पोलीस कसून चौकशी करत असल्याची माहिती नांगरे पाटलांनी दिली आहे. तसेच वाई तालुक्यातल्या बेपत्ता प्रकरणांची नव्याने चौकशी करणार असल्याचं नांगरे पाटलांनी सांगितले.


भूलीचे इंजेक्शन देऊन सहाजणांचा खून 


साताऱ्यातल्या डॉक्टर संतोष पोळनं भुलीचे इंजेक्शन देऊन सहाजणांचा खून केल्याची माहिती समोर आलीय. या हत्याकांडामागं आर्थिक लाभ हे मुख्य कारण असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी धक्कादायक खुलासे होत असल्यानं वाईकरही सुन्न झालेत.


यांची हत्या केली!


- सुरेखा चिकणे, गृहिणी, राहणार वडवली, २० मे २००३ पासून बेपत्ता
- वनिता गायकवाड, गृहिणी, राहणार धोम, ९ ऑगस्ट २००६ पासून गायब
- जगाबाई पोळ, गृहिणी, राहणार धोम, १५ ऑगस्ट २०१० पासून बेपत्ता
- नथमल भंडारी, व्यवसायाने सोनार, राहणार वाई, ७ डिसेंबर २०१५ पासून गायब
- सलमा शेख, नर्स, जानेवारी २०१६ पासून बेपत्ता
- मंगल जेधे, अंगणवाडी शिक्षिका, १६ जून २०१६ पासून गायब


या सहाच्या सहा बेपत्ता लोकांचे खून झालेत आणि त्यांचा खून करणारा नराधम एकच, तो म्हणजे बोगस डॉक्टर. वाई परिसरात डॉक्टर म्हणून वावरणारा संतोष पोळ. धोम गावातल्या त्याच्या राहत्या घराजवळ सुरेखा चिकणेचा सांगाडा सापडला. तर वनिता गायकवाडचा मृतदेह त्यानं कृष्णा नदीत फेकून दिला. बाकीच्या चौघांना त्यानं आपल्या फार्महाऊसवरच पुरून टाकलं. मृतदेह पुरण्यासाठी तो आधी खड्डा खोदायचा आणि  लोकांना संशय येऊ नये, म्हणून त्यावर झाड लावायचा.


थंड रक्ताचा सराईत गुन्हेगार 


डॉ. संतोष पोळ हा थंड रक्ताचा सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. भूल देण्याच्या इंजक्शनचा ओवरडोस देऊन त्यानं हे खून केले.  प्रामुख्यानं आर्थिक फायद्यासाठी त्यानं हे हत्याकांड घडवल्याचं सांगितलं जातंय. 13 वर्षांत केलेले खून पचवण्यासाठी त्याला कुणाची साथ होती का, याचा शोध पोलीस घेत आहेत.


संतोष पोळनं ज्यांचे खून केले, त्या प्रत्येकाशी त्याचे चांगले संबंध होते. ही पोलखोल होताच मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसला. या नराधमाला फाशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.


वाई परिसरात संतोष पोळचा वावर एखाद्या कथित पुढाऱ्यासारखा असायचा. विविध कारणांनी तो पोलिसांवर दबाव आणायचा. त्यामुळंच प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाईत दाखल झालेत. या परिसरातून गायब झालेल्या इतर लोकांचाही पोळशी काही संबंध होता का, यादृष्टीनं पोलीस तपास करत आहेत.