पुणे : इंजीनिअरिंगचे २ विद्यार्थी लोणावळ्यात मृतावस्थेत आढळले, आहेत, यातील तरूण २२ तर तरूणी २१ वर्षांची आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरुणीचे हात मागे बांधलेले होते. तसंच तिच्या तोंडात कपडा कोंबला होता, विवस्त्र करुन तीक्ष्ण वस्तूवर डोकं आपटल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतं. तसंच दोघांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणाही आढळल्या, असं लोणावळा शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितलं.


सोमवारी एका स्थानिकाने  या दोघांचे मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले.


तरुणी कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच राहत होती. तर तरुण लोणावळ्यात भाड्याने घर घेऊन राहत होता.


ते दोघेही मित्र होते आणि रविवारी एकत्र बाहेर गेले होते. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  आम्ही सर्व बाजूंनी विचार करुन तपास करत असून पोस्टमॉर्टेम रिपोर्टची वाट पाहत आहे, असं पोलिसांनी सांगितलं.


पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही मृत विद्यार्थी लोणावळ्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. तरुणी मूळची जुन्नरमधील ओतूरची आहे. तर मुलगा अहमदनगरच्या राहुरीचा रहिवासी होता.