नागपूर : जिल्हा परिषदेत नोकरी देण्याचं खोटं आमीष दाखवत अनेकांना फसवल्याचा प्रकार नागपुरात उघड झालाय. या सर्व तरूणांना अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयात नोकरी लावून देण्याचं आमीष एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या दोन साथीदारांसह दिलं होतं. तिघांना पोलिसांनी अटक केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात अमरावती जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याची शंका व्यक्त होतेय. अमरावती जिल्हा परिषदेत नोकरी लावून देतो असं आमीष दाखवून अनेकांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे यात फसवणूक झालेल्या पुरूषोत्तम बोराडे या व्यक्तीने आत्महत्या केलीय. 


हुबेहूब कागदपत्रं आणि सही शिक्का तयार करून अनेकांची फसवणूक करण्यात आली. नागपूरच्या मौदा तालुक्यात राहणाऱ्या पुरूषोत्तम बोराडेंना अजय खोबरकरने हे आमीष दाखवत ६ लाख रूपये उकळले. हे पैसे उभे करण्यासाठी बोराडेंनी आपले दागिने विकले, कर्जही घेतलं. 



फसवणुकीच्या या रॅकेटची मास्टरमाईंड चंद्रकला खर्डेकर नावाची महिला होती. अमरावती जिल्ह्यात ही महिला मुख्याध्यापिका आहे. मात्र ती आपण शिक्षणाधिकारी असल्याची बतावणी करायची. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर बोराडेंनी आपल्या पैशांची मागणी चंद्रकला खर्डेकरकडे केली. मात्र तिने बोराडेंशी संपर्कच तोडला. अखेर कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या बोराडेंनी आत्महत्या केली. या प्रकरणात आणखी किमान २४ तरूणांची ९५ लाखांना फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 


या रॅकेटमध्ये सापडलेल्या तरुणांना अमरावती जिल्हा परिषदेच्या कार्यालयातून फोन आणि SMS येत असत. त्यामुळे फसवणुकीच्या या प्रकरणात तेथील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत का याचा शोधही घेतला जातोय. पोलिसांनी चंद्रकला खर्डेकर, अजय खोबारकर आणि नरेश फुंडकर या तिघांना अटक केली आहे.