नाशिक : बनावट नोटा छापणाऱ्या रँकेटचा पर्दाफाश झाल्याने नाशिक शहरात एकाच खळबळ उडली. राष्टवादी कॉंग्रेसच्या पदाधिका-यांसह १२ जणांची आता मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आलीय. मात्र गेल्या वर्षभरात नाशिक शहरातील विविध बँकामध्ये हजारो रुपयांचा बनावट  नोटांचा भरणा झाल्याचं उघडकीस आल्यानं छबू नागरे आणि त्याच्या साथीदारांनी छापलेल्या नोटांचा यात समावेश आहे का याचा तपास सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटाबंदींचा निर्णय लागू केल्यानंतर सर्वत्र काळा पैसा पांढरा करण्याचे उद्योग सुरु झालेत. यात रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांबरोबरच  व्हाईट कॉलर म्हणून समाजात मिरविणारे हातात हात घालून फिरताना  दिसत होते. याच काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा माजी पदाधिकारी छबू नागरे  आणि त्याच्या १२ जणांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. 


 त्यामुळेच चलनातील या बनावट नोटा व्यवहारात आल्याचा संशय व्यक्त केला जातो. गेल्या  दीड वर्षात नाशिकमध्ये बनावट नोटा चलनात आल्याचे २१ गुन्हे दाखल झाले. बँकेच्या  विविध शाखांमध्ये  ४३ हजार ७५० बनावट नोटांचा भरणा झाल्याचा गुन्हा एकट्या अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालाय.  छबु  नागरे आणि त्याच्या टोळीने छापलेल्या बनावट  नोटा आणि बँकेत भरणा झालेल्या नोटांचा काही सबंध आहे का त्या दृष्टीनेही तपास सुरु आहे.


अंबड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात ५० रुपयापासून हजार रुपयापर्यंतच्या  बनावट नोटा बँकेत भरणा झाल्याचं निदर्शनास आलंय. यात शंभर रुपयाच्या १७. पाचशे रुपयाच्या ३८ आणि हजार रुपयाच्या २३ नोटांचा भरणा झाल्याचा गुन्हा दाखल झालाय. असेच गुन्हे नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. ५०० आणि हजार रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्या असल्या तरी इतर नोटा आजही चलनात असल्यानं त्यांचा शोध घेण्याची मोठी जबाबदारी पोलीस आणि नागरिकांवर आहे.


दरम्यान, बनावट नोटा छापल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा युवा पदाधिकारी छबू नागरे आणि त्याच्या ११ साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केल्याने पक्षाची चांगलीच बदनामी झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटा छापणाऱ्या छबूला फासावर लटकवा, अशी मागणी पवारांनी केली आहे. आगामी निवडणुकीत विरोधक याचंच भांडवल करणार हे लक्षात आल्यामुळ शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतलीय. छबूला फासावर लटकवण्याची मागणी पवारांनी केलीय.