नागपूर : तुम्ही पिस्ता खाताय, तर तुम्हाला सावध करणारी ही बातमी. कारण हा पिस्ता तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात साठा करण्यात आलेला पिस्ता नसून शेंगदाणा होता. या शेंगदाण्याला पिस्त्याचा रंग देऊन तो पिस्ता म्हणून विकण्यात येत होता. नागपूरच्या FDA अधिका-यांनी टाकलेल्या धाडीत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश झालाय आहे. 


शेंगदाण्याला पाण्यात दोन-तीन तास उकळून नंतर त्यात रंग टाकण्यात येतो. त्यानंतर हे शेंगदाणे वाळवले जातात आणि मशीनच्या सहायाने त्याचे तुकडे करून पिस्ताच्या नावावर त्याची विक्री केली जाते. नागपूरच्या टेका नाका भागात अन्वर खान या व्यापाऱ्याच्या दुकानावर टाकलेल्या धाडीत हा सगळा प्रकार उघड झालाय.



या धाडीत अधिका-यांनी दोन लाखाचा माल जप्त केला असून तो पुढील परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. रंग देण्यासाठी वापरल्या जाणा-या रंगातील रसायनामुळे कॅन्सरसारखा रोग होण्याची शक्यता असल्याचे FDA अधिका-यांनी सांगितलंय. बाजारात पिस्त्याची किंमत आठशे ते नऊशे रुपये किलो आहे. रंग दिलेला हा बनावट पिस्ता 80 ते 90 रुपये किलोनं बाजारात सर्रास विकला जातो. मात्र आरोग्याला घातक असल्यानं ग्राहकही सावध झालेत. 


पिस्ता ऐवजी शेंगदाणा वापरणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक आहे. महागड्या पिस्त्याचे आपण पैसे देतो मात्र त्याऐवजी आपल्याला कमी किंमतीचे शेंगदाणे आणि आरोग्याला अपायकारक शेंगदाणे मिळतात. हा चीड आणणारा प्रकार असून अशी प्रतिक्रिया व्यक्त होऊन याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आलेय.