तीन टन कांदा `त्या` शेतकऱ्याला रस्त्यावर फेकावा लागला
शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतमाल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं सरकारी अभियान फसल्याचं आणखी एक उदाहरण ठाण्यात समोर आलंय.
ठाणे : शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळावा यासाठी त्यांना शेतमाल थेट शहरात विकण्यासाठी प्रोत्साहीत करण्याचं सरकारी अभियान फसल्याचं आणखी एक उदाहरण ठाण्यात समोर आलंय.
जुन्नर तालुक्यातला एक शेतकरी ठाण्यातल्या कळव्यात कांदा विकण्यासाठी आला होता. मात्र, स्थानिक विक्रेत्यांनी दादागिरी करून या शेतकऱ्याला हुसकावून लावलं. त्यामुळे तब्बल तीन टन कांदा या शेतकऱ्याला रस्त्यावर फेकून जावं लागलं.
सांगा कसं जगायचं शेतकऱ्यानं?
बाजार समितीत कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्यानं जुन्नर तालुक्यातले शेतकरी शरद पांबरे यांनी मोठ्या आशेनं ठाणे गाठलं. ठाण्यातल्या कळव्यात त्यांनी आपला तीन टन कांदा विक्रीसाठी आणला. मात्र, सरकारची शेतमालाच्या विक्रीसाठी कुठलीही सुविधा नसल्यामुळे, त्यांनी आशेपोटी रोजंदारीवर तीन मजुरांना घेऊन तीन टन कांदा कळव्यातल्या मनीषा नगर परिसरात रस्त्यावरच विक्रीसाठी मांडला.
मात्र, स्थानिक विक्रेत्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरूवात केली. त्यामुळं त्रस्त झालेल्या पांबरेंना अखेर आपला सर्व कांदा रस्त्यावरच टाकून गावचा रस्ता धरावा लागला.