साताऱ्यात गोळीबार करण्यात आलेल्या तंटामुक्त अध्यक्षाचा मृत्यू, आरोपीला अटक
आर्थिक वादातून तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास साळुंखे यांच्यावर भरदिवसा दत्ता भाईंगडे याने गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले साळुंखे यांचा मृत्यू झाला.
सातारा : आर्थिक वादातून तंटामुक्त समिती अध्यक्ष विकास साळुंखे यांच्यावर भरदिवसा दत्ता भाईंगडे याने गोळीबार केला. या गोळीबारात गंभीर जखमी झालेले साळुंखे यांचा मृत्यू झाला.
साळुंखे हे सायंकाळी बाजारतळावर आले होते. कऱ्हाड तालुक्यातील चाफळ येथील आठवडा बाजारात भाईंगडे याने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. या घटनेने बाजारतळावर तणावाचे वातावरण आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दत्ता भाईंगडे हा बंदूक हातात घेऊन त्याचठिकाणी उभा होता. काही वेळाने घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
जखमी विकास साळुंखे यांना ग्रामस्थांनी उपचारार्थ त्यांना कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे. पाटण तालुक्यातील जाधववाडी येथील दत्ता भाईंगडे हा जीपमधील बारा बोअरची बंदूक हातात घेऊन खाली उतरला. विकास साळुंखे त्यांच्या दुचाकीवर बसून काहीजणांशी बोलत असताना पाठीमागून त्यांने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. विकास साळुंखे गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ग्रामस्थांनी त्यांना उचलून तातडीने रुग्णालयात हलविले.