भर कार्यक्रमात नक्षलवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, जवान शहीद
एरव्ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे नक्षली उघडे पडले. गडचिरोली जिल्ह्यातील छल्लेवाडा गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नक्षल्यांनी रक्तपात घडवून आणलाय.
गडचिरोली : एरव्ही बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा सांगणारे नक्षली उघडे पडले. गडचिरोली जिल्ह्यातील छल्लेवाडा गावात बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नक्षल्यांनी रक्तपात घडवून आणलाय. या हल्ल्यात एका जवानाला आपले प्राण गमवावे लागलेत.
अहेरीचे माजी आमदार दीपक आत्राम या समारोहात प्रमुख अतिथी होते. कार्यक्रम सुरू झाल्यावर दुपारी सहा नक्षल्यांनी साध्या वेशात येत कार्यक्रमात प्रवेश मिळवला आणि अंदाधुंद गोळीबार केला.
हल्यात एक जवान शहीद
अंगरक्षक नानाजी नागोसे यांनी दीपक आत्राम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी नक्षल्यांनी नागोसे यांनाच अत्यंत क्रूरपणे गोळ्या घातल्या. जखमी अंगरक्षक नागोसे यांची भरलेली अत्याधुनिक एके ४७ रायफल नक्षल्यांनी पळवून नेली.
जखमी जवान नागोसे यांना तातडीने हेलिकॉप्टरद्वारे रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालय मैदानावर शहीद पोलीस जवान नानाजी नागोसे यांना अंतिम मानवंदना देण्यात आली.