हेल्मेट विसरणाऱ्यांना निबंध लिहिण्याची, भविष्य ऐकण्याची शिक्षा
नाशिकमध्ये टू व्हीलर चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरू नका. नाहीतर तुमच्यावर निबंध लिहायची वेळ येईल, किंवा भविष्य ऐकायला लागेल.
नाशिक : नाशिकमध्ये टू व्हीलर चालवण्याआधी हेल्मेट घालायला विसरू नका. नाहीतर तुमच्यावर निबंध लिहायची वेळ येईल, किंवा भविष्य ऐकायला लागेल.
ही शाळा भरलीय नाशिकच्या मुंबई नाका परिसरात. मात्र बेंचवर बसून निबंध लिहीणारे हे आहेत हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार. हेल्मेटसक्तीचे न्यायालयाचे आदेश आहेत. मात्र ते न घालणा-यांना पोलिसांनी चक्क हेल्मेटसक्तीचे फायदे या विषयावर निबंध लिहायलाच बसवलं.
500 रूपये दंड भरा नाहीतर 400 ओळींचा हेल्मेटचे फायदे या विषयावर निबंध लिहा अशी सक्ती पोलिसांनी केली. एवढंच नाही तर हेल्मेट घातलं नाही तर तुमचं काय होईल हे सांगायला जोतिषीच बसवला. जोतिषाकडून भविष्य ऐकायला नाशिककरांच्या रांगाच लागल्या.
ज्या नागरिकांनी हेल्मेट घातलं त्यांना पोलिसांकडून गुलाबाचं फूलही मिळालं. हेल्मेट हे नागरिकांच्या चांगल्यासाठी आहे हे मान्य असूनही नाशिककर हेल्मेट टाळण्यासाठी काहीही हास्यास्पद सबबी देत होते.
विना हेल्मेटवाल्यांना शिस्त लावल्यावर वाहतूक पोलीस बेशिस्त चारचाकी चालकांकडे मोर्चा वळवणार आहेत. सीटबेल्ट न लावणा-यांवर कारवाई होईल. दंड भरला नाही तर एक तासाचा माहितीपट वाहन चालकांना पाहावा लागेल. याचा परिणाम काय होतो. बेशिस्तांना खरंच शिस्त लागणार का हे येत्या काळातच कळेल.