अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे
गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.
नांदेड : गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.
अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. कारण वीज नसल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी जनरेटरची मदत घ्यावी लागली. धरणातून ६६ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
विजबिलाची थकबाकी
विशेष म्हणजे विष्णुपुरी धरणाचा विद्युतपुरवठा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. अंधारात इथला कारभार सुरू आहे. नांदेडच्या पाटबंधारे विभागावर वीज बीलाचे २५ कोटी ४० लाखांची थकबाकी आहे. त्यामुळं विद्युत विभागानं २०१३ साली विष्णूपुरी धरणाचा वीजपुरवठा खंडीत केलाय.
विद्युत पुरवठ्याअभावी धरणाला धोका...
ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींनी ऊर्जामंत्र्यांच्या कानावर घातल्याने वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश देण्यात आलेत. मात्र, अजूनही वीज पुरवठा सुरु करण्यात आलेला नाही.
आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली तर विद्युतपुरवठ्या अभावी विष्णुपुरी धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.