इंधनाची पाईपलाईन... मुंबई ते थेट नागपूर
नागपूर सुपर एक्सप्रेस हायवेला समांतर अशी एक गॅस पाईपलाइन टाकली जाणार आहे.
मुंबई : नागपूर सुपर एक्सप्रेस हायवेला समांतर अशी एक गॅस पाईपलाइन टाकली जाणार आहे.
गॅस, पेट्रोल डिझेल आणि एलपीजीची ही पाईपलाईन असेल. याद्वारे मुंबईतल्या तेल शुद्धिकरण प्रकल्पातून गॅस थेट विदर्भ आणि नागपूरपर्यंत पोहोचवला जाणार आहे.
राज्य सरकार सुमारे 700 किलोमीटर लांबीचा मुंबई - नागपूर सुपर एक्सप्रेस हायवे बांधणार आहे. या मार्गाला समांतर गॅस पाईपलाईन टाकण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना दिला होता.
मुख्यमंत्र्यांचा हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी मुंबईतल्या कार्यक्रमात केली. यामुळे नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा आणि विदर्भात गॅस, पेट्रोल डिझेल आणि एलपीजी स्वस्त आणि वेगानं नेणं शक्य होणार आहे.