पुण्यात लेडी प्रिन्सने शिक्षकाला केली चपलेने मारहाण
शिक्षण संस्थाचालकाच्या मुलीने शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय.
पुणे : शिक्षण संस्थाचालकाच्या मुलीने शाळेतील शिक्षकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडलाय. महत्वाचं म्हणजे शाळेच्या आवारात चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडला. संस्थांतर्गत वादातून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.
मारहाण करणा-या तरूणीचं नाव सपना रणनवरे असं आहे. पुण्यात विश्रांतवाडीतल्या जनता विद्यालयात ही घटना घडलीय. शाळेत बसवलेल्या कॅमे-यात हा प्रकार कैद झाला आहे. मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव गणेश पाटील असे आहे. गणेश पाटील यांना अक्षरशः चपलेनं मारहाण करण्यात आली.
गणेश पाटील यांनी संस्थेतील गैरकारभाराविरोधात तक्रार केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. संस्थाचालक अँथनी जॉन रणनवरे यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. गणेश पाटील या शिक्षकानेच आपल्याला शाळेत येण्यास मज्जाव करत मारहाण केल्याचा आरोप त्यांची मुलगी सपना रनवरे यांनी केला आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी संबंधित तरुणीविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.