शाळेतल्या आवारातच शिक्षकांचा मुलींवर लैंगिक अत्याचार
यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय.
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूल शाळेतल्या १० ते १२ विद्यार्थ्यांनीचा विनयभंग करण्यात आल्याचं उघड झालंय.
जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. गंभीर बाब म्हणजे दोन शिक्षकांनीच हा चीड आणणारा प्रकार केल्याचं समोर आलंय. यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर अशी या शिक्षकांची नावं आहेत.
कशी झाली घटना उघड
अमोल क्षीरसागर हा ड्रॉईंग टीचर असून यश बोरुंदीया नृत्य शिक्षक आहे. पीडित मुलींना त्रास होऊ लागल्याने पालकांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा हा गंभीर प्रकार डॉक्टरांच्या लक्षात आला. या मुलींशी विचारपूस केल्यानंतर त्यांनी या शिक्षकांच्या घृणास्पद कृत्याला वाचा फोडली.
शाळेतच दिवसाढवळ्या सुरू होता प्रकार
शाळेतल्या वॉशरूममध्ये हे दोन्ही शिक्षक मुलींवर लैंगिक अत्याचार करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून हा किळसवाणा प्रकार सुरु होता. याची माहिती मिळताच संतापलेल्या पालकांनी शाळेला घेराव घातला.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
दरम्यान संस्थाचालक हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पालकांनी केलाय. वाढता तणाव लक्षात घेता पोलिसांनी, दोन्ही शिक्षकांना ताब्यात घेतलंय. या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.