मुंबई : यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एक वर्ष सोन्याचे दागिने घेतले नाही तर फरक पडत नाही' असा पवित्रा महिलांनी घेतलाय. उलट तेच पैसे आम्ही दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ, असं म्हणत महिलांनी एक पाऊल पुढे टाकलंय. तर काही महिलांनी दागिने खरेदीऐवजी तेच पैसे डिपॉझिट करण्याचा निर्णय घेतलाय.  


जळगावात सराफ बाजार सुरूच...


केंद्राच्या अबकारी कराच्या विरोधात सराफ व्यावसायिकांनी देशभरात संप पुकारला असला तरी जळगावातले सराफ बाजार मात्र सुरु आहे. जळगावात मार्च महिन्यात १९ दिवस बंद पुकारण्यात आला होता. या काळात सुमारे ७० कोटींच्या उलाढालीवर परिणाम झाला होता. कर मागे घेण्यात आला नसला, तरी करामुळे व्यापाऱ्यांना त्रास होणार नाही आणि इन्स्पेक्टर राज येणार नाही, असं आश्वासन सरकारनं दिलं.


त्यानंतर २० मार्चला सुरू झालेला बाजार आजपर्यंत सुरू आहे. लग्नसराईनिमित्त बाजारात लगबगही पहायला मिळतेय. उद्यादेखील बाजार सुरूच राहिल असे संकेत जळगाव शहर सराफ असोसिएशननं दिलेत. त्यामुळे गुढीपाडव्यानिमित्त मुहूर्ताची सोनं खरेदी निदान जळगावकरांना तरी करता येणार आहे. जळगावचे व्यापारी सरकारच्या आश्वासनावर समाधानी असतील, तर राज्यात अन्य शहरांमध्ये हे का शक्य नाही? असा प्रश्न आता सर्वसामान्य ग्राहक विचारत आहेत.