रत्नागिरी :  खेडमधल्या फागे कुटुंबीयातले सदस्य सध्या त्रस्त आहेत, ते आपल्या हक्काची जमीन हडप केल्यामुळे. ही जमीन भरणे इथल्या माजी ग्रामसेवकांनी हडप केल्याचा आरोप दिपक फागे आणि कुटुंबीयांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या हक्काची जमीन आपल्याला परत मिळावी यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, खेड प्रांताधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.  


फागे कुटुंबीयांची तब्बल 12 गुंठे जमीन मुंबई-गोवा महामार्गाजवळ होती. या जमिनीच्या सातबा-यावर फागे कुटुंबीयांची तब्बल चार नावं आहेत. त्यापैकी दोघांची संमती न घेता ही जमीन विकलीच कशी असा सवाल विचारला जातोय.


मात्र जुलै 2010 मध्ये सोनू फागे यांच्याकडून ही जमीन घेतल्याचा दावा ग्रामसेवक अनिल दरडी यांनी केलाय. मात्र सोनू फागे यांचा मृत्यू मे 2010 मध्येच झाला आहे, त्यामुळे दरडी यांनी खरेदी खत आणि घोषणापत्र केलंच कसं असा सवाल उपस्थित होतोय. 


ग्रामसेवक अनिल दरडींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत. आपण रीतसर जमीन विकत घेतल्याचा दावा त्यांनी केलाय. 


आपल्या हक्काची जमीन मिळवण्यासाठी फागे कुटुंबीयांचा प्रशासनासोबत संघर्ष सुरूय. त्यांच्या संघर्षाला यश मिळतं का ते पाहणं महत्त्वाचं आहे.