नांदेड : नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे. पूरामुळे पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग हाऊसमध्ये पाच कर्मचारी अडकून बसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदेडला पाणी पुरवठा करण्यासाठी आसना नदीवर पर्यायी पाणी पुरवठा योजना सुरु करण्यात आली. पाणी पुरवठा योजनेच्या ठिकाणी मेंढला नाला जोडला जातो. गेल्या दोन दिवसांतल्या अतिवृष्टीमुळं बंधा-यात पाणी जमा होऊन वाहू लागले, त्याचवेळी पंपिंग हाऊसमध्ये पाच कर्मचारी होते. 


पंपिंग स्टेशनच्या चारही बाजूने आणि शेतातून पाणी वाहू लागल्याने हे कर्मचारी तिथेच अडकून बसले. अग्निशमन विभागाच्या कर्मचा-यांनी दोरीच्या सहाय्याने या पाचही कर्मचा-यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे बंधा-याचे गेट वेळीच न उघडल्याने पाणी शिरुन शेकडो एकर शेतीचं नुकसान झालं आहे, त्यामुळे या शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतं आहे. 


मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची नोंद नांदेडमध्ये झाली आहे. यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यात 213 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर 24 तासात जिल्ह्यामध्ये सरासरी 39 मी.मी. पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात अर्धापूर तालुक्यात 107 मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्या पाठोपाठ भोकरमध्ये 98 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.