रत्नागिरी : कोकणात पावसाची संततधार सुरु आहे. खेड,चिपळणूमध्ये पुराचा धोका कायम आहे. चिपळुणात पाणी भरले तर खेडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. तर महाडच्या बाजारपेठेत पाणी भरलेय. तर पश्चिम महाराष्ट्रातही दमदार पावसाने निसर्ग फुलला आहे.


खेड-चिपळूण शहरात पुराचे पाणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरीच्या खेड आणि चिपळूण शहरामध्ये पुराचे पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे.  चिपळूण शहरात नगरपालिकेने भोंगे देऊन सावधगिरीचा इशारा दिला. तर खेड नगरपरिषदेकडून सर्व नागरिकांना व्‍यापारी वर्गाला सतर्कतेचं आवाहन केले आहे. अतिवृष्‍टी होत असल्‍यानं जगबुडी आणि नारंगी नदीच्‍या  पाण्‍याच्‍या पातळीत वाढ होत आहे. बाजारपेठ परिसरामध्‍ये पाणी येण्‍याची शक्यता आहे. तर सखल भागात पाणी साचले आहे.


गणपतीपुळेमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे गणपतीपुळे, मालगुंड दरम्यानचे रस्ते पाण्याने तुडुंब भरले होते. बसस्थानकाजवळ रस्त्याला तलावाचे स्वरूप आले होते. गणपतीपुळे-नेवरे काजीरभाटी याठिकाणी मुख्य रस्त्यावर दरड कोसळली.  


सिंधुदुर्गात संततधार कायम


रत्नागिरीबरोबरच सिंधुदुर्गात संततधार सुरुच आहे. सावंतवाडी तालुक्‍यात आज कोसळलेल्या पावसाने हाहाकारच माजविला. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने शहरासोबत पूर्ण सावंतवाडीला  दिवसभर झोडपले. ठिकठिकाणी रस्त्यांवर, बाजारपेठेत पाणीच पाणी अशी स्थिती झाली. 


मोती तलाव काठोकाठ भरून वाहत होता. भटवाडी परिसरात पावसाच्या पाण्यामुळे कठडा कोसळल्याने गोठोस्कर मंगल कार्यालयात पाणी घुसले. रस्त्यावर तुडुंब भरलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा झाला.


शहरात पहाटेपासून संततधारा सुरू झाली. आठच्या सुमारास पावसाचे प्रमाण वाढले. तालुक्‍यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. तालुक्‍यातील माजगाव, मळेवाड, ओटवणे परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली.  


रायगडमध्ये नद्यांना पूर


रायगड जिल्हयाच्या काही भागात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम असून महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे . महाड शहरातील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने व्यापारयांची एकच धावपळ उडाली . व्यापारयांनी आपल्या दुकानातील सामान हलवण्यास सुरूवात केली आहे. नगरपरिषदेने नागरीकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या पालिकेने पूरस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे. 


महाडमध्ये 230 तर पोलादपूरात 256 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यातच महाबळेश्वर येथे कोसळत असलेल्या पावसाने महाडच्या बाजूने वाहणाऱ्या काळ व सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. काल रात्री भरतीच्यावेळी पाणी शहरात शिरायला सुरूवात झाली होती. मात्र ओहोटी लागल्याने पाणी पातळी कमी झाली . मात्र आज सकाळी पुन्हा पाणी शहरात घुसण्यास सुरूवात झाली.