लोणावळा-मावळमध्ये अनेक गावांत पाणी शिरले, पर्यटक अडकलेत
लोणावळा आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. तर काही पर्यटक अडकले आहेत.
लोणावळा : लोणावळा आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पवनानगरकडून आपटी, गेवेंडे या गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला असल्याने या गावासोबतचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे या गावाकडे पर्यटनास आलेले काही पर्यटक अडकले आहेत.
लोणावळा शहर आणि मावळ तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरासह अनेक गावांमधून पाणी शिरले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने या गावांचा संपर्क तुटला आहे. मावळ तालुक्यातील आणि लोणावळा शहरातील सर्व धरणे 90 ते 100 टक्के भरली आहेत.
पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणाचे 6 दरवाजे एका फूटने उघडले 3160 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सुरु करण्यात आला असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच वडीवळे धरणातून 6500 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमधून सुरु करण्यात आला आहे. यामुळे इंद्रायणी दुथडी भरून वाहत असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्याने ते वाहतुकीस बंद करण्यात आले आहे.