हायवेवरच्या दारूबंदीमुळे हॉटेल व्यवसायाला मोठा फटका
हायवेवरच्या दारूबंदीमुळे पर्यटन नगरी औरंगाबादच्या हॉटेल व्यवसायाला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतो आहे. पर्यटन उद्योगाच्या जीवावर अनेक मोठी आणि तारांकीत हॉटेलं औरंगाबादमध्ये व्यवसाय करत आहेत. हायवेवरची ही सगळी हॉटेलं बंद झाली आहेत.
औरंगाबाद : हायवेवरच्या दारूबंदीमुळे पर्यटन नगरी औरंगाबादच्या हॉटेल व्यवसायाला सुद्धा मोठा फटका बसताना दिसतो आहे. पर्यटन उद्योगाच्या जीवावर अनेक मोठी आणि तारांकीत हॉटेलं औरंगाबादमध्ये व्यवसाय करत आहेत. हायवेवरची ही सगळी हॉटेलं बंद झाली आहेत.
ऐरवी मैफील रंगवणा-या या जागा आता अशा ओसाड झाल्यासारख्या दिसू लागल्या आहेत. जी हॉटेलं नेहमीच ग्राहकांच्या गर्दीनं भरून असायची ती सर्व हॉटेलं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता बंद पडली आहेत. हायवेवरील दारुविक्री बंदीमुळे औरंगाबादमधली 70 टक्के हॉटेलं बंद पडली आहेत. औरंगाबाद शहरातून 7 हायवे जातात त्यावर 166 बार आहेत. यात ताज सारख्या नामांकीत हॉटेलचाही समावेश आहे. त्यामुळे महापालिकेनं हे हायवे डी नोटीफाईड करून हॉटेल सुरु ठेवण्यास मदत करावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिक संघटनेनं केली आहे.
महापालिका आयुक्तांनीही याबाबत सकारत्मक भूमिका घेत, बार असोसिएशन सोबत बैठक घेतली. या बाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याच्या हालचाली आयुक्तांनी सुरु केल्या आहेत. कोर्टाच्या दारुविक्री बंदी निर्णयामुळे 20 हजारापेक्षा जास्त लोकांच्या नोकऱ्यांवर सुद्धा गंडांतर आलं आहे. त्यामुळे किमान शहरी भागातली हॉटेलं तरी सुरु ठेवावीत अशी मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपची सत्ता असलेली औरंगाबाद महापालिका यावर काय भूमिका घेते यावरच सगळं अवलंबून असणार आहे.