कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय
कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.
औरंगाबाद : कावळ्यासमोर बसून हा पती आपल्या पत्नीचं गाऱ्हाणं मांडतोय. करणार तरी काय? असा प्रश्न या पुरुषाला पडलाय. कायदा ऐकून घेत नाही, समाज ऐकत नाही, सगळं करून थकलो आणि अशा पूजेला लागलो असं या पुरुषाचं आता म्हणणं आहे.
कावळ्याला व्यथा सांगावी आणि होमहवन करुन पत्नीपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका व्हावी म्हणून ही देवपूजा सुरु असल्याचं पीडित पती सांगतायत. पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून होणारा त्रास एका कागदावर लिहून त्याचं वाचन कावळ्या समोर करत तो कागद हवन कुंडात स्वाहा करून दु:ख विसरण्याचा प्रयत्न ही पुरुष मंडळी करताय. औरंगाबादमध्ये खास उभारलेल्या पत्नी पीडित आश्रमाच्या पूजेवेळी हा कार्यक्रम घेण्यात आला.
महिलांसाठी कायदे झाले त्यामुळे महिलांना संरक्षण तर मिळालं मात्र त्याच कायद्याचा आधार घेऊन अनेक महिला पती आणि सासरच्या मंडळींचा छळ करत असल्याचा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे अनेक पुरुष त्रस्त आहेत.
अशा पीडित पुरुषांसाठी आता औरंगाबादेत हे अनोखं पत्नी पीडित पुरुष आश्रम तयार करण्यात आला. या आश्रमात पीडित पुरुषांना कायदेशीर मदत देऊन धीर दिला जाणार आहे. महिलांबरोबर पुरुषांसाठी संरक्षण कायदा तयार करण्याची मागणी पत्नी पीडित संघटनेने केली आहे.
देशात स्त्री - पुरुष समानता आहे असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा कायद्यात महिलांचं जास्त ऐकलं जातं. त्यामुळेच ही संघटना आता देशभर पत्नी पीडित पुरुषांसाठी काम करणार असल्याचं सांगतायत. या संघटनेत महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, गुजरातमधून अनेक पीडित या संघटनेचे सदस्य झाले असून आकडा शंभरवर पोहोचलाय. त्यामुळं तुम्हीही पत्नीपासून बेजार असाल तर मदतीला पत्नी पीडित संघटना आहेच.