अवकाळी पाऊस, गारपिटीने नाशकात अनेक गावांना तडाखा
शेतमालाला भाव नसल्यानं बळीराजा हैराण असतांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांना तडाखा बसला आहे.
नाशिक : शेतमालाला भाव नसल्यानं बळीराजा हैराण असतांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावांना तडाखा बसला आहे.
सटाणा तालुक्यातील नामपूर, अंबासन, काकडगाव, द्याने, मौराणे, बीजोरसे, आसखेडा, वाघळे ,गोरहाने या मोसम काटच्या गावांसह निरपूर, निकवेल, कंदाणे, तिळवण या पश्चिम पट्ट्याला सुमारे अर्धा तास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार झोडपून काढले.
गारपीट आणि पावसानं डाळिंब, कांदा, आंबा, गहू तसंच कांदा बियाण्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. शेतात काढून ठेवलेला कांदा अवकाळी पावसानं भिजला. तसंच अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले होते. सततच्या अस्मानी संकटानं बळीराजा पुरता बेजार झाला आहे.