कल्याण : दहिहंडी उत्सवात सुप्रिम कोर्टाचे निर्बंध धाब्यावर बसवून गोविंदा पथकांनी थर रचले खरे. मात्र याचा फटका राधेश्याम गोविंदा पथकातील लहानग्या सुजल गोडापकरला बसला आहे. उल्हासनगरच्या दहीहंडी उत्सवात सहाव्या थरावरून पडून सुजल गोडापकर जबर जखमी झाला. आता त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वोच्च न्यायालयाने दहिहंडी उत्सवात गेल्या अनेक वर्षात मरण पावलेल्या आणि जखमी गोविंदाचा आकडा पाहून सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही निर्बंध घातले. मात्र काही राजकीय पक्षांनी चिथावणी देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधांना पायदळी तुडवीत अनेकांचे जीव धोक्यात टाकले. त्यातच उल्हासनगर येथील शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात कोणतेही सुरक्षिततेचे उपाय न पाळल्याने सुजल गोडापकर हा 12 वर्षांचा गोविंदा जबर जखमी झाला. आता हॉस्पिटलमध्ये तो मृत्यूशी झुंज देतोय. 


सुजल गोडापकर हा सहावीत शिकत असून त्याचे कुटुंब अतिशय गरीब आहे. वडील वेल्डिंगचे काम करतात तर आई घरकाम करून घराचा गाडा हाकते. सुजलला झालेल्या अपघातामुळे आईला धक्का बसलाय. तर गोविंदा पथकांनी योग्य काळजी घेतली असती तर हा अपघात टळला असता, असे मत सुजलच्या वडिलांनी व्यक्त केले आहे.


पोलिसांनी मात्र याप्रकरणी दही हंडी उत्सवाचे प्रमुख राजू माने आणि राधेश्याम गोविंदा पथकाचे प्रमुख योगेश डांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. सुजलला झालेल्या अपघातातून गोविंदा पथकांनी काही धडा घ्यावा असं मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहे.