कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास प्रगतीपथावर असून, हल्लेखोरांना लक्ष्य ठेऊन त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरु असल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरात पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत त्यांनी ही माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. याप्रकरणात तपासातील हायकोर्टाला विचारल्याशिवाय कुठलीही माहिती सार्वजनिक करू नका असा निर्देश आज हायकोर्टानं दिला. याप्रकरणी आज सीबीआयनं नवा चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर हायकोर्टानं हे ताशेरे ओढले.


स्कॉटलंड यार्डनं तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्याचं सीबीआयनं कोर्टात स्पष्ट केलंय. दरम्यान आज हायकोर्टाच्या बाहेर अंनिस आणि इतर समविचारी संघटनांनी सीबीआयच्या संथ तपासाविरोधात निदर्शनं केली.


दाभोलकरांच्या हत्येला आज तब्बल 41 महिने पूर्ण होत आहेत. अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. ज्यांना पकडले आहे, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यात सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा कमालीची दिरंगाई करत असल्याचा दाभोलकर समर्थकांचा आरोप होता.