पुणे : ISISमध्ये भरती होण्याबाबत अजुनही भारतीय तरुणांचा ओढा दिसून येत आहे. ISISशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी संध्याकाळी अब्दुल रौफ या तरुणाला ताब्यात घेण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रौफ ISIS या संघटनेच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा संशय होता. ई-मेलच्या माध्यामातून काही संशयितांशी तो संपर्क साधत होता. तो कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो दुबईला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता, अशी माहिती पुढे आलेय.


अब्दुल रौफ याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेसह गुप्तचर खात्याने (आयबी) लक्ष ठेवले होते. तो मंगळवारी सायंकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला निघाल्याची माहिती मिळताच त्याला तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले. त्याची चौकशी सुरू आहे.


रौफ दुबईमार्ग सिरीयात जाऊन  ISIS या दहशतवादी संघटनेत भरती होणार असल्याची माहिती तपासयंत्रणांना मिळाली होती. मात्र याबाबत सध्या कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आयसीसशी संबंधांच्या संशयावरून देशभरातून १४ तरूणांना अटक करण्यात आली होती.