जात-पंचायतीचा निर्णय : मुलीनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं म्हणून...
मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.
मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक : मुलीने घरच्यांच्या इच्छेविरोधात समाजातीलच दुसऱ्या मुलाशी लग्न केल्याने पंचांनी सासरच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक जिल्ह्यात घडलाय. पाच वर्षापूर्वी झालेल्या विवाहाची झळ या कुटुंबाला आता बसू लागली असून कुटुंबातील मुलामुलींचं लग्न होत नाहीत.
मुलीनं मर्जीनं केलं लग्न
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातल्या रावळगावमध्ये राहणारं नाथपंथी डवरी गोसावी समाजातील राजकपूर शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाची ही कहाणी... पाच वर्षांपूर्वी त्यांच्या घरात हेमा ही मुलगी लग्न होऊन आली. हेमाच्या कुटुंबियांनी तिचं लग्न ज्या मुलाशी ठरवलं होतं त्याच्याशी हेमाने लग्न केलं नाही. तिने तिच्याच समाजातल्या शिंदे कुटुंबातल्या मुलाशी लग्न केलं... त्यामुळे संतापलेल्या माहेरच्या कुटुंबियांनी पंचांकडे तक्रार केली. पंचांनी एकतर्फी निर्णय देत शिंदे कुटुंबियांना जातीतून बहिष्कृत केलं.
त्यावेळच्या या निर्णयाच्या झळा आता शिंदे कुटुंबियांना बसत आहेत. त्यांच्या धाकट्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जुळवण्यात त्यांना अडचणी येत आहेत... तर हेमाशीही माहेरच्यांनी संपूर्ण संबंध तोडलेत. तसंच लग्नानंतर आपल्याच कुटुंबाकडून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तिने केलाय.
पोलिसांची टाळाटाळ
पंचांच्या एकतर्फी निर्णयाविरोधात शिंदे कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. पण, गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिंदे कुटुंबियांनी केलाय. अखेर अंनिसशी त्यांनी संपर्क साधला असता अंनिसने पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारून या प्रकाराला वाचा फोडली.
पुरोगामी राज्य असा आपल्या राज्याचा लौकीक. पण अजूनही जातपंचायतींचा पगडा आपल्या समाजावर प्रचंड आहे, हेच या आणि अशा अनेक उदाहरणातून दिसतंय. जात-पंचायतीला मूठमाती देण्यासाठी केवळ मेळावे घेऊन नाही तर समाजातल्या सूज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन चळवळ उभारण्याची गरज आहे.