मन हेलावून टाकणारी दुःखद घटना


विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : झी २४ तासच्या अनन्य सन्मानार्थींच्या शौर्य पुरस्काराच्या ६ जणांच्या प्राथमिक  यादीत नाव असलेले ६० वर्षीय रमजान कासम पिंजारी उर्फ कचरू वस्ताद यांचे आज जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथे दुःखद निधन झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आधुनिक काळातील देवदूत असलेला हा अवलिया माणूस खरोखर पुन्हा होणे नाही. दोन्ही डोळ्यांनी अंध असतानाही कचरू वस्ताद यांची पंचक्रोशीत जीवरक्षक किंवा एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या जलतरणपटूला लाजवेल अशी कामगिरी होती. 


त्यांनी किती जणांना जीवदान दिले याबाबत सांगणे कठीण, परंतु, पाण्याखाली तळ न दिसणाऱ्या विहीरीतुन मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना मदत करणे, विहिरीत पडलेल्या शेतकऱ्यांचे कृषीपंप क्षणात काढून बाहेर आणणे हे कार्य कचरू वस्ताद अंध असूनही लीलया पार पाडायचे. 


हे सगळे करून त्यांना मिळायची फक्त शाब्बासकी आणि एक कागदी प्रशस्तीपत्र. त्यांच्या याच विलक्षण कामगिरीची दखल घेऊन झी २४ तासने अनन्य सन्मान पुरस्कारासाठी त्यांचे नॉमिनेशन केले होते. सोमवारी कचरू वस्ताद यांचे प्रोफाइल शूट करण्यासाठी जाणार होतो.  परंतु: ते गेल्या दोन तीन दिवसांपासून ते थंडीतापाने फणफणले होते. आज अचानक निरोप आला... की, कचरू वस्ताद आता आपल्यात नाहीत...! 


खरोखर मन हेलावून गेलं. की जिवंतपणी एका चांगल्या देवमाणसाला न्याय नाही देऊ शकलो...ईश्वर, अल्लाह कचरू वस्ताद यांच्या मृतात्म्यास शांती देवो...