नागपूर : नगरपालिका निवडणुकांच्या रणसंग्रामात काटोलमध्ये मतदानाला हिंसक वळण लागलं. यावेळी विदर्भ माझा पक्षाचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. या संदर्भात आम्ही भाजप आमदार आशीष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काटोलमध्ये नगरपालिका निवडणुकीला गालबोट लागलं. विदर्भ राज्याच्या मुद्यावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विदर्भ माझा पक्षाच्या नेत्यांची हेटी गावात भाजप नेत्यांशी वादावादी झाली. विदर्भ माझा पक्षाचे नेते चरणसिंह ठाकूर यांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडण्यात आल्या. या प्रकरणी भाजप आमदार आशिष देशमुख यांच्याविरोधात काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.


या घटनेनंतर विदर्भ माझा पक्ष आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. देशमुख यांनी तोडफोड करण्यासोबत शिवीगाळ करुन धमकावल्याचा आरोपही चरणसिंह ठाकूर यांनी केलाय. तर विदर्भ माझा पक्षाचे नेते मतदारांना पैशाचे आमिष दाखवत असल्याचा पलटवार भाजपनं केलाय. 


आशीष देशमुख यांच्यावर दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाल्यानं जामीन मिळवण्यासाठी त्यांना धडपड करावी लागले. आता देशमुख यांच्याबाबत हायकमांड काय भूमिका घेतं याकडं लक्ष लागलंय.