COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : पोलिसांमध्ये एक हळवा माणूस दडलेला असतो याचा प्रत्यय, औरंगाबादच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात आला. एका किडनॅप झालेल्या मुलीला जंग जंग पछाडत पोलिसांनी शोधलं आणि तेव्हापासून, ही चिमुकली पोलिसांच्या प्रेमातच पडली. आता औरंगाबादचं जवाहरनगर पोलीस ठाणं म्हणजे या मुलीसाठी आपुलकीची, खेळण्याची जागा आहे..


निरिक्षकांजवळ न घाबरता बसते... एवढंच नव्हे तर खाऊसाठी, फिरायला नेण्यासाठी बालहट्टही करते. पोलिसांच्या वागणुकीमुळे या मुलीचा पोलिसांचा लळा लागला आहे. आठ महिन्यांपूर्वी या मुलीचं घराबाहेर खेळत असताना तिचं अपहरण झालं...गरीब मायबापानं मुलीला खूप शोधलं देखील...तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखत जणू शोधमोहिमच हाती घेतली.


संपूर्ण राज्यात औरंगाबाद पोलिसांच्या टीम या चिमुकलीला शोधण्यास रवाना झाल्या. पोलिसांचा वेग पाहता अपरहरणकर्त्यांनाच भीती वाटली असावी...त्यांनी 8 दिवसांनंतर मुलीला औरंगाबाद शहरात सोडून पोबारा केला. भेदरलेली मुलगी कुणासोबतही बोलत नव्हती. तिच्या सर्वांगावर सिगारेटच्या चटक्यांच्या खुना होत्या.


 मुलगी तर मिळाली मात्र आरोपी मिळाले नाही. त्यात पुन्हा असं कुठल्याही मुलीसोबत होवू नये म्हणून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु ठेवला, मात्र आरोपीचा माग फक्त मुलगीच सांगू शकत होती आणि ती काहीही बोलत नव्हती म्हणून पोलिसांनी मुलीसोबत मैत्री केली. तिच्यासह खेळणं, फिरणं, अगदी तिच्या घरी जाऊन तिच्या सोबत वेळ घालवणं सारं काही पोलिसांनी केलं. त्यातूनच पोलीस आणि चिमुरडीमध्ये असं नातं फुललं...


त्यातूनच काही दिवसांनी मुलीनं पोलिसांना आरोपी कसा दिसतो? काय केलं? हे सगळं सांगितलं. पोलिसांनी त्यादृष्टीनं तपास सुरू करत दोन पुरुष आणि एका महिलेला अटक केली. तेव्हा या मुलीला वेश्याव्यवसायासाठी विकण्यात येणार होतं असं समोर आलं. आता हे आरोपी जेरबंद झालेत आणि मुलगी पोलिसांची लेकच झाली आहे.


चिमुरडीची आई सुद्धा पोलिसांची कायम ऋणी आहे. मुलगी पोलीस स्टेशनमध्ये खेळायला गेली की तिची आई बाहेर बसून मुलीची वाट पाहते. पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनीही आता या चिमुरडीचा भार उचललाय. तिचं सर्व शिक्षण आता कल्याणकर करणारेत. तिला पोलीस व्हायचंय आणि तिची ही इच्छा पूर्ण करण्याचा चंगच त्यांनी बांधलाय. यावरून खाकीतला माणूस कसा असतो याचं दर्शन झालं.