प्रशांत परदेशी, धुळे : बनावट मद्य सम्राटांनी आलिशान घरांमध्ये भुयारघर तयार करून कसे बनावट मद्य निर्मिती कारखाने चालवले आहेत याचा भांडाफोड धुळे एलसीबीने केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एलसीबीने धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे अश्याच एका भुयार घरातील मद्य निर्मिती कारखाना उध्वस्त करून लाखो रुपये किमतीचा मद्यसाठी जप्त केला आहे. वरवाडे येथील नारायण माळीच्या आलिशान घरावर पोलिसांनी छापा टाकून हि कारवाई केली आहे.


माळीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या घरातून सुमारे साडेचार लाखांचा बनावट मद्यसाठी जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग या कारखान्यापासून अनभिज्ञ कसा, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 



धुळे जिल्हा हा तीन राष्ट्रीय महामार्गांवर आणि दोन राज्यांच्या सीमेवर असलेला जिल्हा. त्यामुळे दिवसाला हजारो वाहनांची ये जे ठरलेलीच. याच भौगोलिक आणि दळणवळणांच्या साधनांमुळे जिल्ह्यात बनावट मद्य निर्मितीचे कारखाने सऱ्हास चालवले जातात. यावर प्रथम कारवाई करण्याची जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे, मात्र हा विभाग जिल्ह्यात फक्त बघ्याची भूमिका घेण्यासाठी कार्यरत असल्याचे दिसत आहे.


एकीकडे पोलीस कारवाई करत असताना धुळ्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाला मात्र कुणी वालीच नाही, अशी स्थिती आहे. कोणाची तक्रार नाही म्हणून कारवाई करत नाही, असं या विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांचं उत्तर अवाक करणारं आहे. उत्पादन शुल्क विभागाची ही भूमिका 'लक्ष्मी दर्शना'च्या सततच्या योगामुळे आल्याचं 
जाणकार सांगतात.